Apple Ultra Fold iPhone 18 Pro
नवी दिल्ली: आयफोन निर्माता कंपनी ॲपल या वर्षी आपल्या नवीन सिरीजच्या लाँचिंगची तयारी करत आहे. गेल्या ३-४ वर्षांपासून कंपनी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आपली नवीन सिरीज सादर करत आली आहे आणि या सप्टेंबरमध्येही ती एक मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे.
ॲपल सप्टेंबरमध्ये नवीन 'आयफोन १८ प्रो' सिरीज आणि 'ॲपल अल्ट्रा फोल्ड' जो त्यांचा पहिला फोल्डेबल हँडसेट लाँच करण्याची शक्यता आहे. ॲपलने आगामी सिरीजबाबत अधिकृत तपशील जाहीर केले नसले, तरी अनेक लीक झालेल्या अहवालांमधून याबद्दल बरीच माहिती समोर आली आहे.
विविध टेक वेबसाईट्स आणि रेंडर्सच्या माध्यमातून आगामी आयफोन सीरिज आणि फोल्डेबल हँडसेटमध्ये काय काय नवीन पाहायला मिळणार, याचे अंदाज वर्तवले जात आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये 'iPhone Ultra Fold'ची प्रतिकृती असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे टेक विश्वात या फोनबाबतची उत्सुकता वाढली आहे.
'ॲपल आयफोन अल्ट्रा फोल्ड'मध्ये दोन डिस्प्ले असतील: एक बाह्य ५.४९-इंच स्क्रीन आणि दुसरी अंतर्गत ७.७६-इंच स्क्रीन. दोन्ही डिस्प्ले पॅनेलमध्ये LTPO OLED तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या डिव्हाइसमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये दोन ४८ मेगापिक्सेल सेन्सर्स असतील; तसेच सेल्फीसाठी १८ मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा असेल.
'आयफोन १८ प्रो'मध्ये उच्च-कार्यक्षमता देणारा चिपसेट असेल; विशेष म्हणजे, ॲपल यात २ नॅनोमीटर तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या पुढच्या पिढीतील प्रोसेसरचा वापर करणार आहे. 'आयफोन १८ प्रो'मध्ये सुधारित कॅमेरा सेन्सर्स असतील, ज्यामध्ये व्हेरिएबल ॲपर्चर असलेल्या मुख्य कॅमेरा लेन्सचा समावेश असेल. कंपनीकडून डिझाइनमध्ये फारसे मोठे बदल होण्याची शक्यता नसली, तरी हार्डवेअरमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा अपेक्षित आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुट्टे भाग आणि प्रगत चिप्स महागल्यामुळे अॅपल आपल्या फोनच्या किमतीत लक्षणीय वाढ करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी iPhone 18 Pro सीरिजच्या किमतीत थेट २०,००० रुपयांपर्यंतची मोठी वाढ होऊ शकते, ज्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी युजर्सना अधिक पैसे मोजावे लागतील.