पुढारी ऑनलाईन डेस्क : जॉन्सन अँड जॉन्सनला बेबी पावडर तयार करण्यापासून रोखणारा एफडीएचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे कंपनीला आता जॉन्सन बेबी पावडर (Johnson & Johnson baby powder) उत्पादन विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जॉन्सन अँड जॉन्सनला बेबी पावडरची विक्री आणि वितरणावर बंदी घातली होती. अलीकडेच, FDA ने बेबी पावडर तयार करण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन प्लांटचा परवाना रद्द केला. यासह, कंपनीला बाजारातून उत्पादन मागे घेण्याचे आदेश देण्यात आले होते. एफडीएच्या या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली, दरम्यान उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची (Johnson & Johnson baby powder) पुन्हा चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी न्यायालयाने पुन्हा नमुने घेऊन दोन सरकारी आणि एका खासगी लॅबमध्ये पाठवण्यास सांगितले होते. दरम्यान या काळात कंपनी पावडरचे उत्पादन करू शकेल, परंतु विक्री आणि वितरणावर बंदी असेल. असेही न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशात म्हटले होते.
डिसेंबर 2018 मध्ये, FDA ने अचानक तपासणी केली. यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या पुणे आणि नाशिक प्लांटमध्ये गुणवत्ता तपासणी करण्यात आली. मुलुंड प्लांटमधून घेतलेल्या बेबी पावडरचे नमुने प्रमाणित दर्जाचे आढळले नाहीत. 2019 मध्ये, या चाचणीवर एक निर्णय आला, ज्यामध्ये असे म्हटले होते की मुलांसाठी ही त्वचा पावडर IS 5339:2004 च्या नियमांनुसार नाही. यानंतर, औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 अंतर्गत कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र कंपनीने या कारवाईला आव्हान देत पुन्हा चाचणी करण्याचे आवाहन केले