पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा आशिया कपमधील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. सुपर 4 फेरीत पाकिस्तान आणि त्यानंतर श्रीलंकेकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे बहुतांश मार्ग बंद झाले आहेत. या दोन्ही सामन्यात अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) भारतासाठी शेवटचे षटक टाकले आणि शेवटपर्यंत धक्का दिला. पण सुपर 4 मधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात झेल सोडल्यामुळे तो निशाण्यावर आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) हॉटेलमधून टीम बसमध्ये जात आहे. त्याचवेळी एक व्यक्ती त्याला 'गद्दार' असे म्हणून हिणवत आहे आणि झेल सोडल्याबद्दल शिविगाळ करत आहे. यादरम्यान अर्शदीप सिंग बसमध्ये उभा राहतो आणि थोडा वेळ त्यांच्याकडे खुन्नस देऊन पाहतो आणि मग पुढे जातो.
अर्शदीपला 'गद्दार' असे संबोधताच सुरक्षा कर्मचारीही सक्रिय होतात. टीम बसजवळ उपस्थित असलेले क्रीडा पत्रकार विमल कुमार हेही त्या माथेफिरू व्यक्तीला फटकारतात. ते म्हणतात की, अर्शदीप हा भारतीय खेळाडू आहे आणि तुम्ही त्याला उद्देशून असे शब्द कसे वापरत आहात?
हा गदारोळ सुरू असतानाच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि टीम बसमधून दूर नेले. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या क्षणी अर्शदीप सिंगच्या हातातून आसिफ अलीचा झेल सुटला होता. हा झेल सोडणे टीम इंडियाला महागात पडले. अखेर रोहित ब्रिगेडला सामना गमवावा लागला.
या सामन्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपवर (Arshdeep Singh) निशाणा साधण्यात आला होता. विकिपिडियावर तर अर्शदीपच्या नावापुढे खलिस्तान असा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर देशातील क्रीडा तसेच राजकीय वातावरण तापले होते. मात्र या घटनेनंतर देशातील क्रीडा तसेच अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी अर्शदीपला पाठिंबा दिला. त्यातच विराट कोहली आणि नंतर रोहित शर्माने उघडपणे सांगितले की, 'कॅच ड्रॉप होणे हा खेळाचा एक भाग आहे, अशा परिस्थितीत तुम्ही कोणालाही टार्गेट करू शकत नाही. प्रत्येक खेळाडू आपल्या चुकांमधून शिकत असतो आणि पुढे जात राहतो.'
विशेष म्हणजे श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांविरुद्ध भारताला अखेरच्या षटकात पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही सामन्यांमध्ये अर्शदीप सिंगने शेवटचे षटक टाकले. अटीतटीच्या सामन्यात शेवटचे षटक फेकणे हे खूप जोखमीचे काम असते. अनेक सामन्यांमध्ये आपण पाहिलंय की फलंदाज हमखास शेवटच्या षटकात गोलंडाजावर तुटून पडतो आणि येथेच्छ धुलाई करतो. पण आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये अर्शदीपने टीच्चून गोलंदाजीचे प्रदर्शन केले. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या षटकात पाच चेंडूत 6 आणि श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या षटकात पाच चेंडूत 7 धावा दिल्या. पण, त्याच्या आधीच्या षटकात प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी अनेक धावा वसूल करून विजयासाठी आवश्यक धावा आणि शिल्लक चेंडू यातील अंतर कमी केले. त्यामुळे अर्शदीपने शेवटच्या षटकात कमी धावा देऊनही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला.