विजय  
Latest

सांगली : काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली; ‘विजय’वर स्वतंत्र बैठक

सोनाली जाधव

सांगली : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेस नेते माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासोबत महापालिकेतील बैठकीला काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील गटाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. जयश्रीताई व विशाल पाटील यांना बैठकीचे निमंत्रण नसल्याने त्यांनी हा पवित्रा घेतला. जयश्रीताई आणि विशाल पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या बहूसंख्य नगरसेवकांची विजय बंगल्यावर स्वतंत्र बैठक झाली. काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आल्याचे स्पष्ट होत आहे.

'विजय'वर स्वतंत्र बैठक

डॉ. विश्वजीत कदम हे शुक्रवारी महापालिकेत येणार असून आयुक्त सुनील पवार यांच्यासोबत बैठक होणार असल्याचा निरोप काँग्रेस नगरसेवकांना गुरूवारी रात्री मिळाला. त्यानुसार नगरसेवक या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येऊ लागले होते. पण काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील तसेच विशाल पाटील यांना या बैठकीचे निमंत्रणच नसल्याचे समर्थक नगरसेवकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जयश्रीताई व विशाल पाटील समर्थक नगरसेवकांनी महापालिकेतील बैठकीला जाण्याचे टाळले. जयश्रीताई पाटील यांचे निवासस्थान असलेल्या विजय बंगल्यावर काँग्रेसचे नगरसेवक जमा होऊ झाले. विशाल पाटील हेही विजय बंगल्यावर आले. त्यांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

महापालिकेत विश्वजीत कदम यांनी आयुक्त सुनिल पवार यांची भेट घेतली. नगरसेवक मंगेश चव्हाण, मयुर पाटील, अभिजीत भोसले, तौफिक शिकलगार तसेच अमर निंबाळकर उपस्थित होते. विजय बंगल्यावर स्वतंत्र बैठक महापालिकेतील बैठकीला जयश्रीताई व विशाल पाटील यांना न बोलावल्याने समर्थक नगरसेवक नाराज झाले होते. जयश्रीताई व विशाल पाटील यांच्या उपस्थितीत विजय बंगल्यावर या दोन्ही गटांच्या नगरसेवकांची बैठक झाली. नगरसेवक संतोष पाटील, फिरोज पठाण, मनोज सरगर, प्रकाश मुळके, करण जामदार, मदिना बारुदवाले, रोहिणी पाटील, संजय कांबळे यांच्यासह काँग्रेसचे बहूसंख्य नगरसेवक उपस्थित होते. महापालिकेच्या आगामी निवडणूकीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

राष्ट्रवादीशी आघाडी नको

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी नको, असा आग्रह विजय बंगल्यावरील बैठकीत काँगे्रसच्या अनेक नगरसेवकांनी धरला. बरीच चर्चाही झाली. आगामी निवडणूक ताकदीने लढायची असे ठरले. दरम्यान ऐनवेळी वरून आदेश आला की आघाडी करावीच लागते, असे एका नेत्याने म्हटले. दरम्यान सध्यातरी स्वबळावर लढायची तयारी करा, अशा सुचना नगरसेवकांना दिल्याचे समजते.

महापालिकेसाठी स्वाभीमानी आघाडी !

काँग्रेसमध्ये गटतट आहेत. वरून लादलेले निर्णयही पाळावे लागतात. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक मदनभाऊ स्वाभीमानी आघाडी किंवा स्वाभीमानी आघाडी या नावाने लढवावी, अशी सूचनाही विजय बंगल्यावरील बैठकीत उपस्थित झाली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना बैठक घेतली नाही. नगरसेवकांना निधी उपलब्ध करून दिला नाही आणि आता महापालिकेत कशासाठी बैठक बोलवली आहे, असे वक्तव्यही एकाने केल्याची चर्चा आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT