नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी, यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा आहेच, मात्र चुकीच्या बातम्या येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण पत्रकारांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे, या संदर्भाने मी बोललो आणि त्यात गैर काही नाही, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. (Chandrasekhar Bawankule)
संबंधित बातम्या
नागपुरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ तर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिप आज व्हायरल झाल्याने राजकारण तापले. यावर बावनकुळे आज माध्यमांशी बोलत होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अनेकदा असे व्यंगात्मक बोलावे लागते, बावनकुळे यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये, अशी पाठराखण उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, कोणत्याही गोष्टीचा निगेटिव्ह अर्थ काढणे चुकीचेच असल्याचे ते (Chandrasekhar Bawankule) म्हणाले.
नागपूरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. फडणवीस यांनी केलेल्या पाहणीच्या व्हिडीओचा विपर्यास करण्यात आला आहे. माध्यमांतून बातम्या चालवण्यासाठी काही लोक चुकीचे नॅरेटिव्ह सेट करण्याचे काम करत आहेत. नागपूरमध्ये अतिवृष्टीनंतर माझ्यासह सर्व भाजपा कार्यकर्ते फिल्डवर होते. दोन्ही नेत्यांनी केलेल्या विकासकामांमुळे मागील दहा वर्षांत नागपूर बदलले आहे. जनतेच्या मनात दोन्ही नेत्याबद्दल आदर आहे. ज्यांनी विकासासाठी एकही रुपया खर्च केला नाही, त्यांनी चुकीची व निगेटिव्ह माहिती पसरवू नये, असेही बावनकुळे म्हणाले.