Latest

ENG vs IND 4th Test: चौथ्या कसोटीत ‘या’ चार जणांना माईल स्टोन गाठण्यांची संधी

Arun Patil

मुंबई : पुढारी ऑनलाईन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा कसोटी (ENG vs IND 4th Test )सामना २ सप्टेंबर रोजी ओव्हल येथे खेळला जाणार आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्सवर विजय मिळवला. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने लीड्समध्ये भारताचा पराभव करून मालिका बरोबरीत आणली. लंडनमधील ओव्हल मैदानात फिरकी गोलंदाज मदत मिळते. त्यामुळे अश्विनला चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फिरकीपटू म्हणजे भागवत चंद्रशेखर, त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत २३ सामन्यांत ९५ विकेट्स घेतल्या आहेत. तर भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या अनिल कुंबळेने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये १९ कसोटीत ९२ विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विनने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध १९ सामन्यांत ८८ विकेट्स घेतल्या आहेत. जर अश्विनला चौथ्या कसोटीत (ENG vs IND 4th Test ) संघात स्थान मिळाले तर त्याने १२ विकेट घेतल्यास इंग्लंडविरुद्ध १०० विकेट घेणारा तो पहिला भारतीय फिरकीपटू बनेल.

एक धाव आणि विराट होणार २३ हजारी मनसबदार

चौथ्या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी मिळणार आहे. विराट कोहलीने एक धाव केल्यावर तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २३००० धावा पूर्ण करेल. असे केल्यास कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३००० धावा करणारा भारताचा तिसरा फलंदाज बनेल. याबाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे, ज्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३४३५७ धावा आहेत. भारताची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४०६४ धावा आहेत.

रोहित शर्मा १५ हजार धावा करणार पूर्ण (ENG vs IND 4th Test )

भारताचा हिट मॅन रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला २२ धावांची गरज आहे. जर त्याने चौथ्या कसोटीत 22 धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा पूर्ण करेल. आतापर्यंत रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४९७८ धावा केल्या आहेत.

तर जसप्रीत बुमराह विकेट्सचे शतक पूर्ण करेल

जसप्रीत बुमराहला कसोटीत १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेटची गरज आहे. त्याने आतापर्यंत कसोटीत ९७ विकेट्स घेतल्या आहेत. जर त्याने चौथ्या कसोटीत ३ विकेट्स घेतल्या तर टेस्टमध्ये त्याच्या १०० विकेट पूर्ण होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT