Latest

स्टीव्ह स्मिथचे 32 वे कसोटी शतक! ‘लॉर्ड्स’वर रचले चार मोठे विक्रम

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या अॅशेस कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 416 धावा केल्या. सामन्याच्या दुस-या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क पहिल्या 20 मिनिटांतच बाद झाले. त्यांना अनुक्रमे स्टुअर्ट ब्रॉड (22) आणि जेम्स अँडरसनने बाद केले. त्यानंतर स्मिथने एक बाजू सांभाळत शतक पूर्ण केले. हे त्याचे 32वे आणि इंग्लंडविरुद्धचे 12वे कसोटी शतक ठरले. सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आठव्या क्रमांकावर पोहचला असून त्याने माजी कर्णधार स्टीव्ह वॉशी बरोबरी केली.

ॲशेसमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यादीत स्मिथ चौथ्या स्थानावर पोहोचला. त्याच्या खात्यात 3173 धावा जमा झाल्या आहेत. त्याच्यापुढे डॉन ब्रॅडमन, जॅक हॉब्स आणि अॅलन बॉर्डर आहेत. स्मिथ 110 धावा करून बाद झाला. जोश टँगने त्याला डकेटकरवी झेलबाद केले. त्याने 184 चेंडूंच्या खेळीत 15 चौकार मारले.

तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. डेव्हिड वॉर्नर (66) आणि उस्मान ख्वाजा (17) यांनी डावाला सुरुवात केली. दरम्यान, पावसानेही सामन्यात व्यत्यय आणला. संघाची धावसंख्या 73 असताना जोस टँगने ख्वाजाला क्लीन बोल्ड करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. चार षटकांनंतर वॉर्नरही जोसच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. नंतर क्रीजवर आलेल्या मार्नस लॅबुशेन (47) याने स्मिथसोबत पहिली शतकी भागीदारी केली. मात्र, अर्धशतकापासून अवघ्या तीन धावा दूर असलेल्या लॅबुशेनला ऑली रॉबिन्सनने विकेटच्या मागे झेलबाद केले.

डावाच्या 75व्या षटकात इंग्लंडचा अर्धवेळ फिरकीपटू जो रूटने धोकादायक ट्रॅव्हिस हेडला बाद केले. रुटचा त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर कॅमेरून ग्रीन (0) रूटचा दुसरा बळी ठरला. कॅमेरून बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या अॅलेक्स कॅरीने (नाबाद 11) स्मिथसह दिवसाचा उरलेला वेळ खेळून काढला.

स्मिथने चार मोठे विक्रम (Steve Smith)

स्मिथ आता ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 99 कसोटी सामन्यांमध्ये 32 शतके झळकावली आहेत. या यादीत रिकी पाँटिंग 168 कसोटी सामन्यांमध्ये 41 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर स्टीव्ह वॉ 168 कसोटीत 32 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 44 शतके आहेत. आता सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने रोहित शर्माला मागे टाकले आहे. याशिवाय स्मिथ कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान 32 शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.

स्मिथने (Steve Smith) लॉर्ड्स कसोटीत आपल्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाला केवळ 400 च्या पुढे नेले नाही तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावाही पूर्ण केल्या. यासह त्याने एक विशेष विक्रमही केला. सर्वात जलद 9000 धावा पूर्ण करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने 174 डावात 9000 धावा पूर्ण केल्या. त्याच्या आधी कुमार संगकाराने 172 डावात अशी कामगिरी केली आहे. भारताचा राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 176 डावात 9000 धावा पूर्ण केल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT