Latest

ड्रोनच्या साह्याने पकडली तब्बल 2 कोटींची वीजचोरी

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करून उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणार्‍या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या साह्याने छडा लावला आहे. मुकेश अगरवाल असे या वीज चोराचे नाव असून, त्यास महावितरणने 2 कोटी 4 लाखांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती परिमंडलाकडून ही माहिती देण्यात आली.

सणसवाडी (ता. शिरूर) येथे मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पैकी मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि. व मे. प्रकाश करुगेटेड पुणे प्रा.लि. हे दोन उच्चदाबाचे, तर मे. भगवान ट्यूब प्रा.लि. हे लघुदाब ग्राहक आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने थर्माकोल व पुठ्ठा बनविण्याचे काम होते. मे. भगवान ट्यूब या ग्राहक जोडणीचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद केला होता, तर इतर दोन वीज जोडण्यांचा वीजपुरवठादेखील थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंदच आहे.

महावितरणने वीजपुरवठा बंद केलेला असतानाही वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या अतिउच्चदाब रोहित्रातून थेट वीजपुरवठा सुरू केल्याची माहिती केडगावचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना खबर्‍यामार्फत मिळाली. वीजचोरी मोठी असल्याने व संबंधित ग्राहकाने गेटवर बंदोबस्त लावून आत जाण्यास मज्जाव केल्याने दरवडे यांनी ही बाब मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या कानावर घातली. तेव्हा मुख्य अभियंता पावडे यांनी वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यास सांगितले. 25 ऑगस्टला संदीप दरवडे आठ जणांच्या पथकासह गेले. कुरिअर पार्सल देण्याच्या निमित्ताने एका दुचाकीवरून त्यांनी एका मित्रासह आत प्रवेश मिळवला. पुराव्यासाठी ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरू केले व तोच बाहेर दबा धरून बसलेल्या टीमने ओळखपत्र दाखवून आत प्रवेश केला आणि वीजचोरीचा पर्दाफाश केला.

मे. प्रकाश करुगेटेड पुणे प्रा.लि. या ग्राहकाला 473290 युनिट वीजचोरीपोटी 1 कोटी 11 लाख 19 हजार 857, मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा. लि. या ग्राहकाला 205606 युनिट चोरीचे 51 लाख 34 हजार 970, तर मे. श्री. भगवान ट्यूब प्रा. लि. या ग्राहकाला 234961 युनिट चोरीसाठी 42 लाख 25 हजार 164 रुपये असे तीन ग्राहकांचे मिळून 2 कोटी 4 लाख 79 हजार 988 रुपये दंडाचे बिल कंपनीचे मालक मुकेश ओमप्रकाश अगरवाल यांना देण्यात आले आहे. तसेच कार्यकारी अभियंता दरवडे यांच्या फिर्यादीवरून भारतीय विद्युत अधिनियम 2003 कलम 135 व 138 नुसार शिक्रापूर पोलिस ठाण्यात वीजचोरीचा व वीज यंत्रणेत छेडछाड केल्याचा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता म्हसू मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संदीप दरवडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किशोर शिंदे, उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहा. अभियंता गौरी काळंगे व बाळासाहेब टेंगले, कनिष्ठ अभियंता श्रीकांत ताटीकोंडा, जनमित्र विश्वनाथ किंदरे व ज्ञानेश्वर आहिरकर यांनी ही कामगिरी यशस्वी केली. महावितरणने पकडलेल्या या वीजचोरीमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT