Latest

IPL22 : मलिंगाला मागे टाकत चेन्नईच्या या ‘चॅम्पियन’नं केला हा विक्रम

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ हंगामातील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध लखनौ सुपर जायंटस यांच्यात गुरूवारी मुंबईतील ब्रेबोन स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईवर विजय मिळवत लखनौने आयपीएलमध्ये पहिला विजयाची नोंद केली.(IPL22)

हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. त्यामुळे प्रेक्षकांना पैसावसूल सामना पाहण्याची संधी यावेळी मिळाली. या सामन्यादरम्यान चेन्नईचा स्टार ऑल राऊंडर खेळाडूने एका विक्रमाला गवसणी घातली. हा विक्रम करत तो खेळाडू आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी पोहचला आहे.(IPL22)

चेन्नईच्या 'चॅम्पियन'नं केला विक्रम

चेन्नई सुपर किंग्जचा चॅम्पियन अष्टपैलू आणि धोनीचा विश्वासू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आयपीएलमध्ये विक्रम आपल्या नावावर केला आहे. ३८ वर्षीय ब्राव्हो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. काल झालेल्या लखनौ विरुद्ध झालेल्या सामन्यात ब्राव्होने दीपक हुडाला बाद करून ही कामगिरी केली. वेस्ट इंडिजच्या या अनुभवी खेळाडूने मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकून हा विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात चेन्नईला २०० हून अधिक धावा करूनही पराभवाला सामोरे जावे लागले.

मलिंगाला मागे टाकले

लखनौ विरूध्दच्या सामन्यात ब्राव्होने चार षटकांत ३५ धावा देऊन एक विकेट घेतली. या सामन्यात ब्राव्होने मलिंगाचा आयरपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडला. मलिंगाने आयपीएलमध्ये १७० विकेट घेतल्या आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या ब्राव्होने १५३ आयपीएल खेळले असून त्याने १७१ विकेट्स घेतल्या आहेत. २२ धावा देऊन चार विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर लसिथ मलिंगाने १२२ सामन्यात १७० विकेट घेतल्या आहेत.

चेन्नईचा सलग दुसरा पराभव

चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल २०२२ची सुरुवात सर्वात खराब झाली आहे. लखनौ सुपर जायंट्सने रोमहर्षक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ६ गडी राखून पराभव करून चालू मोसमातील पहिला विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ७ बाद २१० धावा केल्या. चेन्नईने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुपर जायंट्स संघाने ३ चेंडू राखून ४ गडी गमावून चेन्नईवर विजय मिळवला. यापूर्वी झालेल्या सामन्यात चेन्नईचा केकेआरकडून पराभव झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT