पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात एका तरुणाने शिरकाव करत फूटबोर्डवर उभं राहून बिनधास्तपणे अमली पदार्थांचे सेवन केले. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या धक्कादायक व्हिडिओवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळें यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं आहे. "महिलांच्या डब्यात घुसून नशा करणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे याबाबत स्पष्ट भाष्य तर करीत आहे."(Drugs in Mumbai Local)
सुप्रिया सुळे यांनी एका 'X' युजर्सची पोस्ट रिपोस्ट करत त्यांच्या 'X' अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतूकीच्या सेवेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. महिलांच्या डब्यात घुसून नशा करणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे याबाबत स्पष्ट भाष्य तर करीत आहेच याशिवाय तरुणांना नशेची ही सामुग्री राजरोसपणे मिळत असल्याचे देखील स्पष्ट करीत आहे. रेल्वे सुरक्षा आणि मुंबई पोलीस यांनी समन्वय साधून काम केले तरच अशा प्रकारांना पायबंद घातला जाणे शक्य आहे. या व्हिडिओची रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी नोंद घेऊन उचित ती कारवाई करणे आवश्यक आहे."
सीआर आणि मुंबई पोलिस प्रतिसाद व्हिडिओ पोस्टला उत्तर देताना, मध्य रेल्वेच्या (Central Railway) अधिकृत हँडलने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याचा शोध घेण्यासाठी शहरातील सरकारी रेल्वे पोलिसांना टॅग केले आहे.
एक तरुण महिला डब्यामध्ये दरवाजाच्या काठावर अगदी आधार घेऊन उभा असताना, तो वारंवार तोंडाला रुमाल बांधून अमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहे. एका 'X' युजर्सने या घटनेचा व्हिडिओ शुट केला आहे. तो व्हिडिओ आपल्या 'X' अकाउंटवर शेअर करत संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानं म्हटलं आहे "महिलांच्या डब्यात आता नशा करण्यापर्यंत मजल हाच आहे का प्रगतशील महाराष्ट्र..!" ही पोस्ट सुप्रिया सुळे यांनी रिपोस्ट केली आहे.
हेही वाचा