नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्जच्या उत्पादनासाठी जिल्ह्यातील बंद कारखान्यांची वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कारखान्यांची नियमित तपासणी करावी, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या आदेशामुळे बंद कारखाने प्रशासनाच्या रडारवर येणार आहेत. (Drug case)
मुंबई पोलिसांनी शिंदे गावातील ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर जिल्हातील यंत्रणा अॅक्शन मोडवर आल्या आहेत. या मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.२७) अमली पदार्थविरोधी कारवायांचा आढावा घेण्यात आला. राजेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीला पोलिस, एमआयडीसी व डीआयसी तसेच कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाघ यांनी जिल्ह्यातील रासायनिक व औषधनिर्मिती कारखाने तसेच बंद अवस्थेमधील कारखान्यांची तपासणी करावी. शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही बसविण्यासह तेथे नशामुक्त अभियान जागृतीपर कार्यक्रम घ्यावे. याठिकाणी असलेली दुकाने, पानटपऱ्यांच्या नियमित तपासणीचे निर्देश वाघ यांनी दिले. (Drug case)
अन्न व औषध प्रशासनाने शेड्युल ड्रग एक्स, एच, एच १ व इनहेलर विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर तसेच त्यांच्याकडील आवक-जावकवर लक्ष ठेवावे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यास ते तातडीने बसविण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले. परराज्याला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांत लक्ष केंद्रित करावे. गुजरात सीमेजवळ चार तपासणी पॉइंट निश्चित करून तेथे वाहनांची नियमित तपासणीच्या सूचना पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्या. दुर्गम भागात खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होऊ नये यादृष्टीने कृषी व वन विभागाने तपासण्या कराव्यात, अशाही सूचना वाघ यांनी केल्या.
रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष
आरोग्य विभागाने व्यसनमुक्ती केंद्रांद्वारे किती व्यसनाधीनांवर उपचार सुरू आहेत याची माहिती गोळा करावी, असे निर्देश राजेंद्र वाघ यांनी दिले. जिल्हा रुग्णालयामध्ये ड्रग्ज सेवन करणाऱ्या व उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. अमली पदार्थविरोधी समितीत कामगार उपआयुक्त व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
हेही वाचा :