राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या आकाशात ड्रोन उठविण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस विभागाने हे आदेश जारी केले आहेत. यात ड्रोन, पॅराशूट, एअरो मॉडेल्स, रिमोट कंट्रोल एअरक्राफ्ट इत्यादी प्रकार उडविण्यास पोलिसांनी प्रतिबंध घातला आहे. कुणीही पूर्व परवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. ही बंदी १० नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. (Nagpur Police)
उपराजधानीत कायदा व सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे विविध उपक्रम राबवित आहेत. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयुध निर्माणी (डिफेन्स), दीक्षाभूमी, आरएसएस मुख्यालय, रेल्वे स्टेशनयासह काही ऐतिहासिक महत्व असणारे स्थळे आहेत. त्यामुळे असामाजिक तत्वाकडून राष्ट्रविरोधी कारवाया होण्याची शक्यता असते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस आयुक्तांनी ही सूचना जारी केली आहे.
दहशतवादी अथवा राष्ट्रविरोधी तत्वांकडून जीवितास आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या हेतूने ड्रोनसारख्या उपकरणांचा वापर हवाई हल्ल्यांसाठी होऊ शकतो. या कारणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका ठरु शकणाऱ्या बाबींना आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील महिन्याभरासाठी उपराजधानीतील प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडवण्यात येणारी अतिलघू (मायक्रोलाईट) विमाने आदी उडविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार बृहन्मुंबईच्या पोलिस आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकान्वये देण्यात आले आहेत.