मंचर : पुढारी वृत्तसेवा
बिबट्याला कुत्र्याने पळवून लावल्याची घटना लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे घडली. ही घटनेचा उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला. शेतकरी गणेश शेवाळे यांचा कुत्रा या घटनेत जखमी झाला. हा सर्व प्रकार तेथील काही स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, परिसरात या कुत्र्याची चर्चा सुरु आहे.
लांडेवाडी गावाच्या हद्दीतील अंगणवाडी परिसरात शुक्रवारी (दि. २४) रात्री ११ वाजेच्या सुमारास शेतकरी गणेश मुरलीधर शेवाळे यांच्या काळ्या नावाच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने बिबट्यावर प्रतिहल्ला केला. बिबट्या आणि कुत्रा यांच्यामध्ये झटापट झाली. कुत्र्याने जोरदार प्रतिकार केल्यावर बिबट्याला पळवून लावले.लांडेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने बिबट्यांचे वास्तव्य वाढले आहेत. रात्रीच्या वेळी व दिवसाही बिबट्या दर्शन देत आहे. त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावावा व बिबट्याला जेरबंद करावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने ॲनिडेर हा कॅमेरा ट्रॅप तेथे लावला आहे. बिबट्या आल्याबरोबर कॅमेऱ्यात कैद होऊन सायरन वाजणार आहे. त्यामुळे नागरिक सतर्क होतील. तसेच वनकर्मचारी गस्त घालतील, अशी माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.
हेही वाचलं का?