मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. या यादीतून पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पत्ता कट झाला आहे. विधान परिषदेचे विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रसाद लाड, भाजपचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे.
यावेळी विधान परिषदेसाठी भाजप पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी देईल, अशी चर्चा होती. पंकजा मुंडे यांनीही पक्षाने संधी दिल्यास त्याचे सोनं करण्याचे संकेत दिले होते. मात्र त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. पाच जणांच्या यादीतून पंकजा मुंडे यांचे नाव कट करण्यात आले आहे.
अपेक्षेप्रमाणे प्रवीण दरेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर प्रसाद लाड यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. भाजप राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांना संधी देईल, अशीही चर्चा होती. मात्र भाजपने उमा खापरे यांना संधी दिली आहे. तसेच प्रा. राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देत मूळ भाजपच्या नेत्यांनाही स्थान दिले आहे. त्याचबरोबर भाजपच्या घटक पक्षांतील नेत्यांनाही डावलण्यात आले आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनाही दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली नाही.
दरम्यान, भाजपला या निवडणुकीत चार जागा जिंकण्याची संधी असताना भाजपने पाच नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
हेही वाचलंत का ?