Latest

बिबटप्रवण तालुक्यात दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करण्याचे निर्देश द्या : खा. डॉ. अमोल कोल्हे

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांतील बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण करावे, तसेच या चारही तालुक्यांत दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केली. या वेळी यासंदर्भात तातडीने बैठक बोलाविण्याचे निर्देश यादव यांनी वन विभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांना दिले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांत बिबट्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून, मानवी वस्त्यांत बिबट्यांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यात अनेक लहान मुलांसह शेतकऱ्यांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे बिबट प्रजनन नियंत्रण करण्याची गरज आहे, अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे सातत्याने मांडत आहेत. याच मागणीच्या अनुषंगाने त्यांनी बुधवारी (दि. ६) केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्री यादव यांच्या सूचनेवरून वन विभागाचे महासंचालक गोयल यांचीही भेट घेतली. त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री यादव आणि महासंचालक गोयल यांनी तातडीने बैठक बोलाविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

 घोणस सर्पदंश झालेल्यांना मदतीची मागणी

बिबट्यांच्या हल्ल्याइतकाच घोणसच्या सर्पदंशाचा विषयही गंभीर झाला आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तींना वेळेत उपचार न मिळाल्यास दगावण्याचा धोका असतो. सर्पदंशावरील उपचारांसाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे अशा रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार व्हावेत तसेच बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा बळी पडलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत केली जाते, त्याच धर्तीवर सर्पदंशाने मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री यादव आणि महासंचालक गोयल यांच्याकडे केली.

या मागणीची तातडीने दखल घेत केंद्रीय मंत्री यादव आणि महासंचालक गोयल यांनी स्नेक बाईट सेंटर सुरू करता येईल का? किंवा घोणस सर्पदंशाचे प्रमाण कमी करता येईल का? याची चाचपणी करण्याचे निर्देशही दिले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT