Latest

Ding Liren : डिंग लिरेन बुद्धिबळाचा जगज्जेता; ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिला चिनी खेळाडू

अमृता चौगुले

अस्ताना; वृत्तसंस्था : ग्रँडमास्टर डिंग लिरेनने (Ding Liren) ऐतिहासिक कामगिरी करताना चीनचा पहिला जगज्जेता बुद्धिबळपटू (New Chess World Champion Ding Liren) म्हणून मिरवण्याचा मान मिळवला. लिरेनने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या रविवारी झालेल्या 'टायब्रेकर'मधील चौथ्या व अखेरच्या डावात रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाशीवर (Ian Nepomniachtchi) मात केली. त्यामुळे नेपोम्नियाशीला सलग दुसर्‍यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर लिरेन 17 वा जगज्जेता ठरला. (fide world championship 2023)

लिरेनच्या विजयामुळे बुद्धिबळ विश्वाला 2013 नंतर प्रथमच नवा जगज्जेता मिळाला आहे. विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मॅग्नस कार्लसनने यंदाच्या जागतिक लढतीतून माघार घेतली होती. त्यामुळे लिरेन व नेपोम्नियाशी यांना जगज्जेतेपदासाठी लढण्याची संधी मिळाली आणि त्यांनी विजय मिळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. (Ding Liren)

लिरेन आणि नेपोम्नियाशी यांच्यात 14 डावांअंती 7-7 अशी बरोबरी होती. त्यामुळे जागतिक अजिंक्यपद लढतीचा विजेता ठरवण्यासाठी 'टायब्रेकर'चा अवलंब करण्यात आला. रविवारी झालेल्या जलद (रॅपिड) 'टायब्रेकर'मधील पहिले तीन डाव बरोबरीत सुटले; मात्र चौथ्या डावात लिरेनला सर्वोत्तम खेळ करण्यात यश आले. (Ding Liren)

चौथ्या डावात पांढर्‍या मोहर्‍यांनिशी खेळणार्‍या नेपोम्नियाशीने 'रूइ लोपेझ' पद्धतीने सुरुवात केली. लिरेनने 11व्या चालीत आपला मोहरा 'ए 4' वर नेला आणि अदलाबदलीला सुरुवात केली. पटावरील स्थिती पाहता हा डावही बरोबरीत सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, लिरेनने 90 सेकंदांपेक्षाही कमी वेळ शिल्लक असतानाही आक्रमक चाली रचल्या आणि नेपोम्नियाशीवर दडपण आणले. अखेर नेपोम्नियाशीचा खेळ खालावला व लिरेनने जेतेपद मिळवले.

मी जिंकलो, तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता. मला अश्रू अनावर होतील हे ठाऊक होते आणि तसेच झाले. मी जगज्जेतेपद मिळवेन, असा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. जगज्जेतेपद माझ्यासाठी फार महत्त्वाचे नाही. विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू म्हणून ओळखला जाणे हे माझे ध्येय होते आणि ते गाठण्याच्या मी जवळ आहे.
– डिंग लिरेन

मला विजेतेपद मिळवण्याची पूर्ण संधी होती. पारंपरिक पद्धतीच्या डावात (14 डाव) मी अधिक चांगला खेळ करून एक अतिरिक्त सामना जिंकला पाहिजे होता. केवळ एक किंवा दोन चालींचा प्रश्न होता; मात्र त्यात मी कमी पडलो. 'टायब्रेकर'मध्ये नशिबाची साथही महत्त्वाची असते.
– इयान नेपोम्नियाशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT