जे. पी. गावित, भास्कर भगरे 
Latest

Dindori Lok Sabha J.P. Gavit | ‘माकप’च्या गावितांचा बंडाचा झेंडा, दिंडोरीतून उमेदवारी जाहीर

गणेश सोनवणे

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा– माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी अखेर आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत दिंडोरी लोकसभा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यमान खासदारांविषयीचा रोष व कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळे ही उमेदवारी करीत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी, 'अजूनही वेळ गेलेली नसून महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांच्या उमेदवारीचा पुनर्विचार करून आपल्याला उमेदवारी द्यावी, असे आवाहन त्यांनी मेळाव्यातून केले. (Dindori Lok Sabha J.P. Gavit)

गेल्या काही दिवसांपासून गावित लोकसभा निवडणूक लढविणार, अशी चर्चा रंगत होती. मात्र, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडीचा घटक असल्याने ते तलवार म्यान करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, शुक्रवारी त्यांनी जाहीर केलेल्या निर्णयाने महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. (Dindori Lok Sabha J.P. Gavit)

येथील नाशिक-कळवण रस्त्यावरील शिडफार्म येथे गावितांनी पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, नांदगाव आदींसह इतर तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका मांडली. यावेळी गावित म्हणाले, मी प्रारंभी निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हतो. मात्र, विद्यमान खासदारांना मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यात अपयश आलेय. त्यामुळे मतदारसंघातील लोकांनी मला निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. त्यामुळे मी निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे सांगत त्यांनी भाजपवरही टीका केली. मोदी सरकार शेतकरीविरोधी असून, व्यापारी धार्जिणे निर्णय घेतले जात आहेत. त्यांचा ४०० पारचा नारा संविधान बदलण्यासाठीचा खटाटोप असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महाविकास आघाडीबाबत बोलताना, सुरुवातीपासूनच आपण महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागत होतो. मात्र, आघाडीच्या नेत्यांनी परस्पर उमेदवार जाहीर केला. अजूनही वेळ गेलेली नसून आघाडीच्या नेत्यांनी पुनर्विचार करून मला उमेदवारी द्यावी, अशी साद त्यांनी मेळाव्यातून घातली.

गावितांना संधी द्या (Dindori Lok Sabha J.P. Gavit )

यावेळी 'सीटू'चे नेते डॉ. डी. एल. कराड म्हणाले, माकपाचा संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाठिंबा असून, त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवारांना होणार आहे. तेव्हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ 'माकप'ला सोडून गावितांना संधी द्यावी, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT