हुपरी; पुढारी वृत्तसेवा : हुपरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर आज 'देवतात्या' म्हणून प्रसिध्द असणाऱ्या तातोबा बाबूराव हांडे यांची निवड झाली. एका तृतीयपंथीयाला या पदावर संधी देण्याची ही राज्यातील पहिलीची निवड आहे. ताराराणी आघाडीने त्यांना संधी दिली आहे. आज हुपरी नगरपालिका आवारात या निवडीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते, तर या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. आमदार प्रकाश आवाडे व जि.प. सदस्य राहुल आवाडे यानी हांडे यांना संधी दिली आहे. 2017 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 3 मध्ये हांडे यानी भरलेला अर्ज त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता. त्यामुळे आजच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष होते. या निवडीबाबत आपण समाधानी असून संपूर्ण राज्यात एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तृतीयपंथीयाला संधी देण्याचे काम ताराराणी आघाडीने केल्याची प्रतिक्रिया जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी यावेळी बोलताना दिली.
हुपरी नगरपालिका ही लोकलढ्यामूळे निर्माण झाली आहे. नगरपालिकेत भाजपा व ताराराणी आघाडी यांच्याकडे प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक करण्याचा अधिकार आहे. ताराराणी आघाडीचे प्रकाश बावचे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.
नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या हुपरी नगरपालिका निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेत्रुत्वाखाली ताराराणी आघाडीने प्रभाग क्रं 3 मधून तातोबा हांडे यांना उमेदवारी दिली होती. हांडे हे श्री रेणुका माता भक्त अहेत. ते परिसरात देवतात्या म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना मानणारा मोठा भक्तवर्ग आहे. तृतीयपंथी असल्यामुळे त्यांच्यावर लोकांची भक्ती आहे. ताराराणी आघाडीने त्यावेळी हांडे यांना उमेदवारी देऊन सर्वानाच धक्का दिला होता. त्यामूळे विरोधी गटात खळबळ उडाली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा तत्कालीन प्रांताधिकारी समीर शिंगटे यानी त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता.
त्या कारणावरून समीर शिंगटे आणि जि. प. सदस्य राहुल आवाडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. पोलिसांना त्यावेळी हस्तक्षेप करावा लागला होता. आमदार प्रकाश आवाडे व जि. प. सदस्य राहुल आवाडे यानी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी तातोबा हांडे यांची निवड निश्चित केली होती. आज नगराध्यक्ष सौ जयश्री गाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खास सभेत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे एकच जल्लोष करण्यात आला. गरीब, सर्वसामान्य आणि जनतेचा पाठिंबा असणाऱ्या एका तृतीयपंथीयाची निवड करुन संपूर्ण राज्यात प्रथमच आवाडे यांनी तृतीयपंथीयाचा सन्मान केल्याची भावना निर्माण झाली आहे. यावेळी ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्याबरोबरच तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीबाबतचे पत्र पक्षप्रतोद सुरज बेडगे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे दिले होते. त्यानुसार ही निवड झाली. निवडीनंतर तातोबा हांडे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
आम्ही जोगवा मागून आयुष्य कंठित आहोत, वयाच्या 12 व्या वर्षापासून जोगवा मागतोय, मात्र माझ्यासारख्याला आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे यांनी मान दिला. त्यांच्यावर तृतीयपंथीयांचे आशीर्वाद कायमस्वरूपी राहतील.
नगरसेवक तातोबा हांडे
हेही वाचा :