नाशिक (लासलगाव) : वार्ताहर
३० जानेवारीची पहाट गुलाबी थंडी अन् दाट धुके असे मनमोहक दृश्य नाशिक जिल्ह्यात पहायला मिळाले. नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यावर दाट धुक्याची चादर पसरली आहे. त्यात नाशिकच्या लासलगाव शहरात तर अत्यंत दाट धुके होते.
पहाटेपासून वाहन चालकांना धुक्यामुळे नीट रस्ताही दिसत नव्हता. रस्त्याचा अंदाज घेत दिवे सुरू ठेऊन कांदा आणि शेतमालाने भरलेली व इतर वाहनांची वाहतूक संथगतीने सुरू होती. पाच-दहा फुटांवरील घरे, इमारती, वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती. धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला होता. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदु असे मनमोहक वातावरण लासलगावकरांसह नाशिककरांनी अनुभवले. दाट धुक्याबरोबर दव बिंदू मोठ्या प्रमाणात असल्याने द्राक्षे मण्यास तडे जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच कांदा पिकांवर ही करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव अधिक वाढेल. अशी माहिती ब्राम्हणगांव विंचूर येथील शेतकरी सुनील गवळी यांनी दिली.
धुक्याची चादर ओढून घेतलेले रस्ते आणि इमारती अशा 'धुकेमय' वातावरणाची अनुभूती लासलगावकर घेत आहेत. पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर शहरावर ओढल्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. शहराच्या विविध भागांत सकाळी धुके पडले. पहाटे धुक्याचे सौंदर्य डोळ्यांत साठविण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार बाहेर पडू लागले आहेत. व्यायामासाठी घराबाहेर पडणारी मंडळीही धुक्याचा मनमुराद आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळते.
हेही वाचा :