विशाखापट्टणम; वृत्तसंस्था : सुनील नारायण व अंगक्रिश रघुवंशी यांच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर येथील आयपीएल साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्स संघाचा 106 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवला. या लढतीत केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 272 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला 17.2 षटकांत सर्वबाद 166 धावांवरच गाशा गुंडाळावा लागला. (DC vs KKR)
सलामीवीर सुनील नारायणने अवघ्या 39 चेंडूंत 85 धावांची आतषबाजी करत केकेआरला फ्लाईंग स्टार्ट मिळवून दिला आणि यामुळे संघाला यानंतर एकदाही मागे वळून पाहावे लागले नाही. सहकारी सलामीवीर सॉल्ट 18 धावांवरच परतला असला तरी तिसर्या स्थानावरील अंगक्रिश रघुवंशीने 27 चेंडूंत 54 धावांची बरसात करत नरेनला अगदी समयोचित साथ दिली. या जोडीने तिसर्या गड्यासाठी 104 धावांची शतकी भागीदारी केली. नारायण दुसर्या गड्याच्या रूपाने बाद झाला, त्यावेळी केकेआरने 12.3 षटकांत 164 धावांपर्यंत जोरदार मजल मारली होती. (DC vs KKR)
नंतर पुढील बहुतांशी फलंदाज फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद होत राहिले असले तरी धावांचा ओघही कायम राहिला आणि यामुळे केकेआरने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 272 धावांचा डोंगर रचला.
विजयासाठी 273 धावांचे कडवे आव्हान असताना दिल्ली कॅपिटल्सची खराब सुरुवात झाली आणि यानंतर ते यातून अजिबात सावरू शकले नाहीत. वॉर्नर (18) व पृथ्वी शॉ (10) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले आणि इतके कमी की काय म्हणून मिशेल मार्श व अभिषेक पोरेल या तिसर्या व चौथ्या स्थानावरील फलंदाजांना अगदी खातेही उघडता आले नाही.
पाचव्या क्रमांकावरील कर्णधार ऋषभ पंत व सहाव्या क्रमांकावरील ट्रिस्टियन स्टब्ज या मधल्या फळीतील अनुभवी फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत अर्धशतके जरूर साजरी केली. पण, कदाचित त्यापूर्वीच दिल्लीच्या हातातून हा सामना सुटला होता. पंतने येथे 25 चेंडूंत 55 तर स्टब्जने 32 चेंडूंत 54 धावांची तुफानी खेळी साकारली होती.
गोलंदाजीत केकेआरतर्फे वैभव अरोराने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 27 धावांत 3 बळी तर वरुण चक्रवर्तीने 4 षटकांत 33 धावांत 3 बळी, अशी धारदार गोलंदाजी केली. याशिवाय, स्टार्कने 2 तर आंद्रे रसेल व सुनील नारायण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
हेही वाचा :