राज्यसभा सदस्य म्हणून मातृभूमीच्या लौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न करेन : मेधा कुलकर्णी यांच्या भावना  | पुढारी

राज्यसभा सदस्य म्हणून मातृभूमीच्या लौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न करेन : मेधा कुलकर्णी यांच्या भावना 

प्रशांत वाघाये, नवी दिल्ली : राज्यसभेवर अलीकडेच निवडून आलेल्या खासदारांमधील १२ नवनिर्वाचित खासदारांना उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी बुधवारी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. महाराष्ट्रातून ६ खासदार राज्यसभेवर निवडुन गेले, त्यापैकी भाजपच्या मेधा कुलकर्णी, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांनी आज शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या दालनात पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यातील भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी संस्कृतमधून शपथ घेतली.

राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी, यांनी ‘पुढारी’शी संवाद साधला. ‘पुढारी’शी संवाद साधताना म्हणाल्या की, “राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेताना खूप भारावून गेले. अनेक दिग्गजांनी आपल्या कर्तृत्वाने, प्रतिभेने आणि वक्तृत्वाने या सभागृहावर आपली वेगळी छाप पाडली, त्यांच्या आवाजाचे ध्वनि माझ्या मनात घूमत होते. माझ्यामधील क्षमतांचा पूर्ण वापर करून आपल्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात उत्तम कामगिरी करून  मातृभूमीच्या वैभवशाली परंपरेत, लौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न करेन असे वचन देते. या संधीबद्दल आणि विश्वासाबद्द्ल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी बी. एल. संतोष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, संघ पदाधिकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. तसेच माझ्यावर प्रेम करणार्‍या सर्व हितचिंतकांची, नागरिकांचीही मी ऋणी आहे, ज्यांचे प्रोत्साहन कायम मला मिळत आले आहे.” असेही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र राज्यातून भाजपच्या मेधा कुलकर्णी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांच्याशिवाय बिहारमधील राजदचे धर्मशीला गुप्ता, मनोज कुमार झा, संजय यादव, गुजरातमधील भाजप खासदार गोविंदभाई ढोलकिया, हिमाचल प्रदेशातील भाजप खासदार हर्ष महाजन, उत्तर प्रदेशमधून खासदार साधना सिंह, मध्यप्रदेशातून एल. मुरूगन, कांग्रेस खासदार अशोक सिंह, कर्नाटकमधून कांग्रेस खासदार जी. सी. चंद्रशेखर, हरियाणातून अपक्ष खासदार जगदीश चंद्रा यांनीहीराज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

Back to top button