पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल पूर्णपणे फ्लॉप ठरला. या सामन्यातील ग्लेन मॅक्सवेलची विकेट वादग्रस्त ठरली. मालिकेतील निर्णायक सामन्यात त्याने ११ चेंडूत केवळ सहा धावा करून तो धावबाद झाला. मात्र, त्याचा धावबाद थोडा वेगळा होता आणि पंचांनी त्याला कसा आऊट दिला हे समजणे खेळाडूंसह प्रेक्षकांना कठीण गेले. दिनेश कार्तिकच्या चुकीमुळे मॅक्सवेलला जीवदान मिळण्याची खात्री होती, पण कार्तिक नशीबवान होता की ती विकेट भारताला मिळाली.
नेमकं काय घडलं आणि मॅक्सवेल आउट झाला? (IND vs AUS)
युजवेंद्र चहलच्या 8 व्या षटकामध्ये हे नाट्य घडलं. चहलच्या षटकात मॅक्सवेलने चेंडू मारला परंतु सीमारेषेवर तो अक्षर पटेलने अडवला. दोन धावा घेण्यासाठी त्याने स्मिथला कॉल केला मॅक्सवेल सहज जाईल असं वाटत होते. पण अक्षर पटेलने मॅक्सवेलच्या दिशेने अचूक थ्रो केला अन् यष्टिंचा वेध घेतला. पण, चेंडू यष्टिंवर आदळण्यापूर्वी बेल्स यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या ग्लोव्ह्जने पडली. दुसरी बेल नंतर चेंडू लागल्याने पडली आणि मॅक्सवेलला ( ६) माघारी जावे लागले. कार्तिकच्या हाताने बेल्स पडल्याने मॅक्सवेलला नाबाद असल्याचे वाटले, पंरतु तिसऱ्या अम्पायरने प्रसंगावधान दाखवून पुन्हा रिव्ह्यू पाहिला आणि त्यात मॅक्सवेल क्रीजवर परतण्याआधी चेंडू लागून दुसरी बेल्स पडल्याचे दिसले त्यामुळे भारताला मॅक्सवेलची विकेट मिळाली.
मॅक्सवेल आउट झाल्यावर अनेकांनी आपली मते व्यक्त केली. काहींच्या मते पंचांनी मॅक्सवेलवर अन्याय केला आहे. मॅक्सवेलच्या विकेटचा ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया संघाची सुरूवात चांगली झाली नाही. फिंच 7, स्मिथ 9, मॅक्सवेल 6, जोश 24,वाडे 1, डेनियल 22 धावा करून बाद झाले. तर कॅमेरॉन ग्रीन 52 आणि टीम डेविड 54 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. या धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 186 धावा केल्या आहेत. टीम इंडियासमोर 187 धावांचे आव्हान ठेवले.
नियम काय आहे? (IND vs AUS)
क्रिकेटच्या नियमांनुसार जर चेंडू मारण्यापूर्वी स्टंपपासून बेल्स वेगळ्या झाल्या तर किमान चेंडू आदळल्यावर एक स्टंप जमिनीवरून उखडला गेली पाहिजे. या सामन्यात चेंडू यष्टिंवर आदळण्यापूर्वी एक बेल्स यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या ग्लोव्ह्जने पडली व दुसरी बेल अक्षरने मारलेल्या चेंडू लागल्याने पडली. त्यामुळे भारताला मॅक्सवेल विकेट मिळाली.