पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकलमध्ये पाठलाग करणार्याच्या तावडीतून उच्चशिक्षित तरुणीची दामिनी मार्शलने सुटका करून तिला तिच्या घरी सुखरूप पोहचविले. सुटीच्या दिवशी दामिनी मार्शलने हे काम केल्यामुळे कौतुक होत आहे. सारसबाग आणि संगमवाडी परिसरात जीवन संपवण्याच्या तयारीत असलेल्या दोन महिलांचे प्राण दामिनी मार्शलने वाचविले.
वेळ : रात्री पावणेदहाची… ठिकाण : लोणावळा ते पुणे लोकल… सुटी असल्यामुळे दामिनी मार्शल सोनाली हिंगे निवांत होत्या. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला… हॅलो मॅडम, मला एक मदत हवी आहे. मी लोकलमध्ये असून, एक तरुण माझा पाठलाग करीत आहे. आपण काहीतरी करा. त्यांनी फोन करणार्या तरुणीला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले, त्या वेळी एक तरुण तिचा पाठलाग करीत असल्याचे दिसले. त्या वेळी क्षणाचाही विलंब न लावता हिंगे यांनी गणवेश परिधान करून थेट शिवाजीनगर रेल्वे स्थानक गाठले.
पाठलाग करणार्या तरुणाने हिंगे गणवेशात दिसताच पळ काढला. हिंगे यांनी तरुणीकडे चौकशी केली असता, तिला कॉलेजच्या समुपदेशन कार्यक्रमात हिंगे यांचा संपर्क क्रमांक मिळाला होता. हिंगे यांनी रिक्षा करून ती राहत असलेल्या कात्रज परिसरात तिला पोहच केले. तिच्या घरच्यांनी हिंगे यांचे आभार मानले.पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे दामिनी मार्शलचे काम पाहत आहेत.
रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून काही मुली शाळेत येत नव्हत्या. प्राचार्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी हिंगे यांना संपर्क करून त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. एक शिक्षिका व त्या पौड फाटा बसथांबा येथे पोहचल्या. त्यांनी मुलींना बसथांब्यावर थांबवून लक्ष ठेवले. त्या वेळी एका 25 वर्षीय तरुणाने मुलींना छेडण्यास सुरुवात केली. या वेळी स्थानिक नागरिकांना हिंगे यांनी मदत मागितली. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यानंतर हिंगे यांनी कंट्रोलला कॉल करून मदत घेऊन तरुणाला पकडून अलंकार पोलिसांच्या ताब्यात दिले.
दामिनी मार्शल सुषमा साळवे यांनी संगमवाडी येथील नदीपात्रात आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला वाचविले. त्यांचे समुपदेशन करून आत्महत्येपासून परावृत्त केले. तसेच, स्वारगेट येथील दामिनी मार्शल स्वाती झेंडे आणि कविता बुद्धे यांनी इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला थांबविले. कौटुंबिक वादातून संबंधित महिला आत्महत्येच्या विचारात होती.
हेही वाचा