मुंबई, पुढारी वृत्तसेवा : दहीहंडी उत्सवाची पंढरी समजल्या जाणार्या ठाण्यासह मुंबई व राज्यात दहीहंडी उत्सव मोठा धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. बोल बजरंग बली की जय… गोविंदा आला रे आला… या गाण्यांच्या तालावर ठेका घेत गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत पाच ते नऊ थरांच्या हंड्या फोडल्या. यावेळी मुंबई, ठाण्यात हजारो गोविंदांसह लाखो नागरिकांचा महासागर लोटला होता. मध्यरात्री उशिरापर्यंत दहीहंडी फोडल्या जात होत्या. (Dahihandi 2023 )
कोरोना महामारीनंतर तब्बल तीन वर्षांनी ठाणे, मुंबईसह राज्यातील विविध शहर व ग्रामीण भागात दहीहंडी उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. ठाणे, मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल आदी शहरांमध्ये लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली होती. अनेक दहीहंड्यांना चित्रपट कलावंतांची आणि सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची हजेरी लागल्याने गोविंदा आणि नागरिकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला होता. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याशिवाय अन्य राजकीय पक्षांचे नेतेही प्रमुख पाहुणे म्हणून ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. मुंबई शहरात तब्बल 500 पेक्षा जास्त मोठ्या बक्षिसांच्या दहीहंड्या होत्या. मुंबई आणि ठाण्यात राजकीय नेते आपापल्या मतदारसंघांत दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करताना दिसत होते.
हेही वाचा