Latest

Cylinder blast Nashik : सिलिंडर स्फोटाचा धोका रस्तोरस्ती, कंपन्यांकडून सुरक्षा मापदंडांकडे दुर्लक्ष

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूररोड परिसरातील शांतिनिकेतन चौकात शनिवारी (दि. 9) सायंकाळी लहान टेम्पोतून वाहतुकीदरम्यान, ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर गॅस व ऑक्सिजन सिलिंडरची धोकादायक वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षिततेची काळजी घेत नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती वर्तवली जात आहे. (Cylinder blast Nashik)

शांतिनिकेतन चौकात झालेल्या स्फोटाने परिसरातील इमारतींच्या व दुकानांच्या काचा फुटल्या. रस्त्यावरील तीन वाहनांचे नुकसान झाले, तर दोन जण जखमी झाले आहेत. अनेकांना ऐकण्यास येत नसल्याच्या तक्रारीही निर्माण झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गतिरोधकाकडे दुर्लक्ष केल्याने व तीनही सिलिंडर व्यवस्थित न ठेवल्यामुळे तीनपैकी एका सिलिंडरचा स्फोट झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पोलिसांनी वाहनचालकासह ऑक्सिजन सिलिंडर पुरविणाऱ्या संबंधित एजन्सीमालकावर गुन्हा दाखल केला. (Cylinder blast Nashik)

सिलिंडरच्या दुर्घटना  (Cylinder blast Nashik)

वडाळा नाका येथे झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात विजेच्या पॉवर स्टेशनसमोरील जागेत वाहनातून ऑक्सिजन सिलिंडर उतरविताना अचानक सिलिंडरचा व्हॉल्व्ह फुटल्याने सिलिंडर थेट भिंतीवर आदळले होते. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नव्हती. तर सातपूरमधील राधाकृष्णनगर येथे रात्री घरात स्वयंपाकावेळी झालेल्या गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू झाला, तर सोळावर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली होती. द्वारका परिसरातील संत कबीरनगर झोपडपट्टी परिसरात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील सिलिंडर फुटले होते. त्यामुळे परिसरात आग लागली होती. जेलरोड परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने महिलेसह तीन मुले जखमी झाली होती. जुने नाशिक परिसरातील म्हसरूळ टेक येथील सिलिंडर स्फोटामुळे आग लागल्याने तीन घरे भस्मसात होऊन संसारोपयोगी साहित्य जळाले होते. तर उत्तमनगरमधील सर्वेश्वर महादेव मंदिर चौकात सिलिंडर स्फोटात घरातील तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

ऑक्सिजनची वाहतूक दिवसाच

महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणी द्रवरूपातील ऑक्सिजन तयार केला जातो. तेथून तो इतर शहरांमध्ये पोहोचविण्यास वेळ लागतो. ही वाहतूक जोखमीची असते. ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या कारखान्यात एक टँकर भरण्यासाठी किमान अडीच ते तीन तास लागतात. टँकरला प्रतितास ४० किलोमीटर वेगमर्यादा असते. रात्री अपघाताचा धोका असल्याने शक्यतो दिवसाच ऑक्सिजन वाहतूक केली जाते.

प्रशिक्षित चालक

गॅस, इंधनासारख्या ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्यासाठी चालकांनी प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. इंधन गळती झाली किंवा स्फोट झाला, तर चालकाने कोणती खबरदारी घ्यावी, हे या प्रशिक्षणात शिकविले जाते. सिलिंडर व्यवस्थित पॅक झाले आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित सिलिंडर उत्पादन कंपनीची असते. गॅस-ऑक्सिजन गळती होऊ नये याची दक्षताही कंपनीकडून घेतली जाते. त्याचप्रमाणे एलपीजी किंवा सीएनजी गॅस वापरणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी अनिवार्य आहे. आयएसओ मानांकनानुसार ही तपासणी केली की हे प्रमाणपत्र मिळते.

संबंधित यंत्रणांकडून काणाडोळा

घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅसच्या उत्पादन, वितरण, वापरावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देखरेख ठेवली जाते. ऑक्सिजन सिलिंडरवर अन्न व औषध प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाते. मात्र दोन्ही यंत्रणांकडून याबाबत नियमित तपासणी होते का? संबंधितांकडून नियमांनुसार सुरक्षिततेचे पालन होते का? गॅस, ऑक्सिजन वाहतूक करताना, तयार करताना किंवा त्याचा वापर करताना योग्य खबरदारी घेतली जाते का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT