Latest

श्रीरामपूर: ‘ओटीएस’ पात्र शेतकर्‍यांना पीक कर्ज द्या; महाराष्ट्र बँक ग्राहक मेळाव्यात शेतकर्‍यांची आर्त हाक

अमृता चौगुले

श्रीरामपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्या शेतकर्‍याला देखील पीक कर्ज मिळावे, यासाठी 'किसान क्रेडीट कार्ड' देण्याचे आदेश बँकांना दिले आहे, परंतु गावाकडील शेतकर्‍यांनी आर्थिक अडचणीतून मार्ग काढत विविध बँकाकडून घेतलेले कर्ज 'वन टाईम सेटलमेंट' (ओटीएस) योजनेत सहभाग घेवून परतफेड केलेले आहे. अशा सर्व ओ.टी.एस. पात्र शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळावे, अशी आर्त हाक शेतकर्‍यांनी दिली आहे.

निमित्त होते चितळी (ता. राहाता) येथे महाराष्ट्र बँकेने आयोजीत केलेल्या शेती पीक कर्ज मेळाव्याचे. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते गंगाधर पा. चौधरी यांनी भूषविले. यावेळी चितळीच्या सरपंच दीपालीताई वाघ, उपसरपंच नारायण कदम, जळगावचे सरपंच शिवाजी साबदे, उपसरपंच दिलीप चौधरी, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अशोकराव वाघ, संपतराव चौधरी, भाऊसाहेब मोरे, महाराष्ट्र बँक पुणे विभागाचे मुख्य व्यवस्थापक नितीन तळपे, अहमदनगर विभागाचे सहा. व्यवस्थापक सागर नाईक, कृषी विभागाचे अधिकारी प्रदिप मोकाने, चितळीचे शाखा व्यवस्थापक शैलेष पाटील, शैलेश वाघ, मच्छिंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी शाखा व्यवस्थापक शैलेष पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. केंद्राने शेतकर्‍यांना चालू राष्ट्रीय हंगामात शेती कर्ज मिळाले पाहिजे, या उदात्त हेतूने 'किसान के्रडीट कार्ड' देण्याची सुचना केली. त्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभा घेवून शेतकर्‍यांनी किसान के्रेडीट कार्डचा लाभ घेण्याचे आवाहन केले, परंतु प्रत्यक्षात शेतकरी बँकेकडे कागदपत्र घेवून आल्यावर बहुतेक शेतकरी काही सहकारी, व्यापारी व सरकारी बँकेचे कर्जदार होते. त्यांना बँकेच्या ओ.टी.एस. योजनेचा लाभ घेवून कर्जाची परतफेड केली, परंतु अशा पत (सिबील) खराब असलेल्या शेतकर्‍यांना कर्ज मिळणार नसल्याचे स्पष्ट केले.

पत्रकार विष्णू वाघ म्हणाले, देशामध्ये उद्योग क्षेत्रात कोट्यावधी रुपयांची कर्जमाफी घेवून काम करणार्‍या अंबानी, अदानी यांना सरकार पुन्हा कर्ज देण्यासाठी पायघड्या टाकते. तसेच सहकार टीकविण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे कर्ज असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना पुन्हा पुनर्रजिवीत करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे कर्ज दिले जाते, मात्र माझा गावाकडील शेतकरी शेती पीक उभे करण्यासाठी कर्ज घेतो, त्याला निसर्गाची साथ मिळत नसल्याने तो कर्जाची परतफेड करु शकत नाही. हे वास्तव सरकार व बँक व्यवस्थापनाला माहित असताना मुळात शेतकरी हा अतिशय प्रामाणिक घटक असल्याने तो उसनवारी करुन बँकेच्या ओ.टी.एस. योजनेचा लाभ घेवून कर्ज फेड करीत असेल तर त्याची बँकेतील पत खराब का होते ? उद्योजक, व्यापारी व सहकारी चळवळी प्रमाणे शेतकरी राजा जगला पाहिजे, या भावनेने ओ.टी.एस. पात्र शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळाले पाहिजे, अशी मागणी केली.

सागर नाईक म्हणाले, चितळी शाखेची थकबाकी 70 टक्केवरुन 40 टक्क्यांवर आली आहे. सरकारकडे निधी नसल्याने शेतकर्‍यांना कोणतीही कर्जमाफी मिळणार नाही. शेतकर्‍यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर काढणे गरजेचे आहे. कारण थकीत शेतकर्‍यांच्या कर्जखात्यामुळे त्याचे सिबिल (पत) खराब होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड करुन आपली पत जपावी, असे आवाहन केले.

नितीन तळपे यांनी शेतकर्‍यांच्या कर्जाबाबत मोठी चर्चा झाली आहे. त्याबाबत योग्य निर्णय घेवू. दरम्यान, चितळी परिसरातील इतरत्र बँक खाते असलेल्या खातेदारांनी येथील शाखेत आपले व्यवहार सुरु करुन गावातील शाखेला मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी अ‍ॅड. अशोकराव वाघ, भाऊसाहेब मोरे, मच्छिंद्र चौधरी, बाळासाहेब साळुंके, गंगाधर चौधरी, नारायण कदम आदींंनी या चर्चेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले. आभार उपसरपंच नारायण कदम यांनी मानले. मेळाव्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँकेने समन्वयकाची भूमिका बजवावी

शेतकरी राजाला देशाचा पोशिंदा समजला जातो. त्याने घेतलेल्या पीक कर्जाची परफेड करताना त्याच्या सिबील रिपोर्ट (पत) चा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामध्ये शेतकरी व सरकार यांच्यामध्ये बँक व्यवस्थापकांनी समन्वयकाची भूमिका घेवून शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.

शैलेश पाटील यांच्या कार्याचा गौरव

महाराष्ट्र बँक चितळी शाखा थकबाकीच्या कारणामुळे इतरत्र स्थलांतर करण्याचा निर्णय झाला होता. ग्रामीण दुष्काळी भागातील ही शाखा स्थलांतर होवू नये म्हणून ग्रामस्थांनी प्रयत्न केले. दरम्यान, चितळी शाखेच्या व्यवस्थापकपदी शैलेष पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांनी अल्पावधीत तोट्यातील शाखा मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल ग्राहक मेळाव्यात विशेष ठराव घेवून त्यांना गौरविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT