पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२३ च्या आगामी वन-डे विश्वचषकाला सुरुवात होण्यास काही महिने बाकी आहेत. चाहत्यांना आपल्या टीमकडून विशेष कामगिरीची अपेक्षा असते. सध्या अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंकडून चांगल्या खेळाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर आहेत? हे जाणून घेऊयात…
१. सचिन तेंडुलकर (भारत)
टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत टॉपवर आहे. त्याने ४४ इनिंगमध्ये ५६.९५ च्या सरासरीने २,२७८ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतक आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. १९९३ आणि २००३ च्या विश्वचषकात त्याने सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या. (Cricket World Cup)
२. रिकी पॉटिंग (ऑस्ट्रेलिया)
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पॉंटिंग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो विश्वचषक विजेता कर्णधार देखील आहे. त्याने विश्वचषकातील ४६ सामने खेळले असून १,७४३ धावा केल्या आहेत. ४५.८६ च्या सरासरीने त्याने फलंदाजी केली आहे. शिवाय विश्वचषक स्पर्धेत ५ शतकं आणि ६ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. (Cricket World Cup)
३. कुमार संगकारा (श्रीलंका)
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगकारा आहे. त्याने विश्वचषकातील ३७ सामने खेळले आहेत. शिवाय, त्याने ५६.७४ च्या सरासरीने १५,३२ धावा केल्या आहेत. त्याने विश्वचषक स्पर्धेत ५ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत. (Cricket World Cup)
४. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)
वेस्ट इंडिचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत ३४ सामने खेळत १२२५ धावा केल्या आहेत. शिवाय ब्रायन लारा याने २ शतक आणि ७ अर्धशतकं सुद्धा झळकावली आहेत.
५. एबी डिव्हीलियर्स (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेचा माजी आक्रमक फलंदाज एबी डिव्हीलियर्स याने २००७ मध्ये विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केले. आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि मैदानाच्या चारी बाजूला चेंडू फटकावण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे त्याला 'मिस्टर ३६०' म्हणून देखील ओळखले जाते. त्याने विश्वचषक स्पर्धेत २३ सामने खेळले असून त्याने १२०७ धावा केल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत डिवीलियर्सने ४ शतकं तर ५ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. (Cricket World Cup)