पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकत्याच झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. उपांत्य फेरीत इंग्लंडकडून दारुण पराभव पत्कारावा लागल्यानंतर टीम इंडियाला आपला गाशा गुंडाळावा लागला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, यष्टिरक्षक दिनेश कार्तिक आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यासाठी हा शेवटचा विश्वचषक ठरल्याचे मानले जात आहे.
आता या सर्वांना दोन वर्षांनी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात संधी मिळणार नसल्याचा अंदाज आतापासूनच वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, माजी कर्णधार कोहलीने शनिवारी (26 नोव्हेंबर) एक पोस्ट शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या इनिंगची आठवण करून देत त्याने एक फोटोही शेअर केला.
कोहलीची पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धडकी भरली. चाहत्यांना वाटले की कोहलीने निवृत्ती जाहीर केली आहे. कोहलीने ही पोस्ट इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केली आहे. यावर कमेंट करताना चाहत्यांनी लिहिलं की, 'सर अशी पोस्ट शेअर करू नका. तुम्ही तर हृदयविकाराचा झटका दिला. मला तर तू निवृत्ती घेतलीस असंच वाटलं.'
याशिवाय आणखी एका यूजरने, 'अशी पोस्ट टाकून तू मला 10 सेकंदासाठी घाबरवलेस. निवृत्तीची बातमी आहे असे वाटले. त्याचवेळी दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिलंयकी, 'हॅपी रिटायरमेंट किंग.' तसेच, एका युजरने या पोस्टचे कनेक्शन मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याशी असल्याचे म्हटलंय. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा फोटो शेअर करत त्याने लिहिलंय की, 'विराट कोहली सरांनी आज पोस्ट का केली, त्याचे कनेक्शन समजत आहे का?'
वास्तविक, कोहलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो बॅटसह पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसत आहे. यासोबत कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, '23 ऑक्टोबर 2022 हा दिवस माझ्या हृदयात नेहमीच खास असेल. क्रिकेटच्या खेळात मला याआधी कधीच इतकी ऊर्जा जाणवली नव्हती. किती छान संध्याकाळ होती ती.'
अशाच पद्धतीने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही दोन वर्षांपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती. त्याने 15 ऑगस्ट 2022 रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिलं, 'तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. मला 7.29 पासून निवृत्त समजा.'