पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. देशातील या रुग्णसंख्या वाढीमागे कोरोनाचा XBB.1.16 व्हेरिएंट असू शकतो. कारण हा व्हेरिएंट एकूण ३४९ नमुन्यात आढून आल्याचे INSACOG डेटामधून निष्पन्न झाले आहे. नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या XBB.1.16 व्हेरिएंटचे ३४९ नमुने आढळले आहेत. या व्हेरिएंटची सर्वाधिक १०५ प्रकरणे महाराष्ट्रात आढळून आली आहेत. त्यानंतर तेलंगणात ९३, कर्नाटक ६१ आणि गुजरातमध्ये ५४ प्रकरणे समोर आली आहेत, असे वृत्त पीटीआयने INSACOG डेटाच्या आधारे दिले आहे.
XBB 1.16 व्हेरिएंट पहिल्यांदा जानेवारीमध्ये आढळून आला होता. त्यावेळी दोन नमुने या व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी तपासण्यात आले होते. INSACOG डेटानुसार, फेब्रुवारीमध्ये XBB 1.16 व्हेरिएंटचे १४० नमुने आढळले. मार्चमध्ये आतापर्यंत या व्हेरिएंटचे २०७ नमुने सापडले आहेत.
देशात अलिकडील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी देशात कोरोनाचे १,३०० नवे रुग्ण आढळून आले. ही रुग्णसंख्या १४० दिवसांतील सर्वाधिक आहे. तर देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ७,६०५ वर पोहोचली आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.
AIIMS चे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी बुधवारी सांगितले होते की नवीन XBB.1.16 व्हेरिएंट अलीकडे होत असलेल्या कोरोना रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत असू शकते. पण यामुळे घाबरण्याची गरज नाही. याच्या संसर्गामुळे गंभीर आजारी आणि मृत्यू होण्याचा धोका नाही.
जगभरातील एकूण रुग्णसंख्येच्या सुमारे १ टक्के कोरोना प्रकरणे सध्या भारतात आढळून येत आहेत. देशात दररोज सरासरी ९६६ प्रकरणांची नोंद होत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दररोज सरासरी १०८ प्रकरणांची नोंद झाली होती. ती आता ९६६ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. ज्या आठ राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत त्यात महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानचा समावेश आहे. या राज्यांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत आपण १६ मार्च रोजी पत्र पाठवले होते, असेही राजेश भूषण म्हणाले.
XBB 1.16 हा नवीन व्हेरिएंट धोकादायक म्हणून पाहिला जात आहे. कारण तो अत्यंत संसर्गजन्य आहे. तो वेगाने पसरतो. XBB.1.16 हा कोरोना विषाणूचा पुनर्संयोजक वंश आहे आणि कोरोनाच्या XBB चा वंशज आहे. विविध आरोग्य तज्ज्ञांच्या मते XBB.1.16 हा SARS CoV 2 चा म्टुटंट स्ट्रेन आहे. मुख्यतः ओमायक्रॉन हा रोग प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो.
सध्या XBB.1.16 व्हेरिएंटमुळे आरोग्याची गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता कमी आहे. श्वसनास अडथळा होणे, डोकेदुखी आणि घसा खवखवणे तसेच ताप, स्नायू दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे तीन ते चार दिवस राहतात.
हे ही वाचा :