पुढारी ऑनलाईन : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. सुरत जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत, हा निर्णय दिला होता. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. अनेक विरोधी पक्षातील नेते, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून आज (दि.२४) संसदेपासून राष्ट्रपतीभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर सोमवारपासून (दि.२७) या घटनेच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे काँग्रेस प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने शिक्षा सुनावली. यानंतर तातडीने त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. परंतु या घटनेचे देशभरात पडसाद उमटले. यानंतर काँग्रेसने तातडीने पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली. राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ काँग्रेस आणि विरोधी पक्ष आज (दि.२४) राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार आहे. दरम्यान, दिल्लीतील विजय चौकात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, "हा केवळ कायदेशीर मुद्दा नाही, तर हा एक अतिशय गंभीर राजकीय मुद्दा आहे. जो आपल्या लोकशाहीच्या भवितव्याशी निगडित आहे. हे मोदी सरकारने धमकावून केलेले सूडाचे राजकारण आहे." असे मत मांडले आहे.
पुढे बोलताना, जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी काल (दि.२४) सुमारे दोन तास बैठक झाली. काँग्रेस पक्षप्रमुख सर्व राज्यातील काँग्रेस प्रमुख आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतील आणि देशव्यापी आंदोलनाचा आराखडा तयार करतील, असेही मत व्यक्त केले आहे.
सुरत न्यायालयाने मानहानी प्रकरणी राहुल गांधींना गुरूवारी (दि.२३) शिक्षा सुनावली. दरम्यान तातडीने त्यांना जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त काँग्रेस कार्यकर्ते आणि विरोधी पक्ष संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत. पक्षाने आपली बाजू मांडण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे वेळ मागितल्याचे देखील जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तसेच सोमवारपासून (दि.२७ ) प्रमुख विरोधी पक्ष या मुद्द्यावर दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.