पुढारी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून (Southwest monsoon) ३ दिवस आधीच अंदमानसह बंगालच्या उपसागरात १९ मे रोजी दुपारी २ च्या सुमारास दाखल झाला होता. आता मान्सून आणखी काही भागांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढील ३ दिवसांत तो दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेट क्षेत्रात पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. (Monsoon Update)
मान्सून केरळात ४ जून रोजीच येणार असल्याचा अंदाज आहे. मागील वर्षी मान्सूनचे अंदामानात आगमन २२ मे रोजी झाले होते. मात्र, तो यंदा २० मे पर्यंत येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून १९ मे रोजी दुपारी २ च्या सुमारास दाखल झाला. तत्पूर्वी चोवीस तास आधी त्या भागात पावसाला सुरुवात झाली होती. हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी ही सुखद वार्ता दिली. मान्सून अंदमान सागरासह बंगालच्या उपसागरातही दाखल झाला असून तो वेगाने प्रगती करतो आहे. यापुढे तो बंगालच्या उपसागरासह अंदामान व निकोबार बेटांवर सर्वत्र पुढे जाईल, असे हवामान विभागाने सांगितले.
गेल्या वर्षी मान्सून २२ मे रोजी अंदमानात आला होता. यंदा तो तीन दिवस आधीच दाखल झाला आहे. त्यामुळे केरळात तो लवकर येईल असा अंदाज आहे. या बाबत पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांना विचारले असता ते म्हणाले, मान्सूनच्या वाऱ्याची दिशा व गती यावर त्याच्या पुढच्या प्रवासाचे अंदाज दिले जातात. तो अंदमानात लवकर आला म्हणजे केरळात लवकर येईल, असा अंदाज बांधता येत नाही. तो केरळात ४ जून रोजीच दाखल होईल असा आमचा अंदाज आहे. (Monsoon Update)
हे ही वाचा :