पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपले चांगल्या महाविद्यालयात शिक्षण पूर्ण व्हावे. यानंतर चांगल्या जागी नोकरी मिळावी. लग्न करावे, पैसे कमवून घर संसार करावा. पोरा बाळांना सांभाळावे आणि आयुष्य सुंदर असावे. पण जर तुम्ही काम करत असलेल्या कंपनीनेच जर तुमचे लग्न लावून देण्यासाठी वधू किंवा वराला जोडीदार निवडण्यास मदत केली तर जीवनात खुप मजा येईल. एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असे करत आहे. त्यातही कुठली विदेशी कंपनी नसून स्वदेशी कंपनी आहे. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये या स्वदेशी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत मॅच मेकिंग सेवा (match making services) ऑफर दिली आहे.
एवढेच नाही तर या कंपनीने आपली प्रतिभा टिकवून ठेवण्यासाठी हा कोड क्रॅक केला आहे. या अंतर्गत जर कर्मचाऱ्यांनी लग्न केले तर त्यांच्या पगारातही वाढ होईल. श्री मूकाम्बिका इंफोसोल्यूशंस (एमएसआई) Sri Mookambika Infosolutions (SMI) असे या कंपनीचे नाव आहे.
सध्या या कंपनीत ७५० पेक्षा अधिक लोक नोकरी करत आहेत. यातील जवळपास ४० टक्के लोक हे गेल्या ५ वर्षांपासून या कंपनीत नोकरी करत आहेत. २००६ मध्ये शिवकाशीत या कंपनीला लॉन्च करण्यात आले. कंपनी लोकांमध्ये प्रसिध्द झाली, मात्र यासोबतच योग्य आणि हुशार लोकांना कामावर ठेवणे ही कंपनीसाठी एक आव्हान बनले होते.
SMI ने आपल्या कर्मचार्यांना विशेष विवाहाची ऑफर दिली आहे. यामध्ये लग्नासाठी मॅच मेकिंग सेवांचे अनुसरण केले जाते. कंपनीने आपल्या सर्व कर्मचार्यांच्या वेतनात दोनवेळा वाढ करण्यास सुरूवात केली. एकावेळी ६ टक्के तर दुसऱ्या वेळी ८ टक्क्यांपर्यंत वेतनात वाढ करण्यात येउ लागली.
या कंपनीचे संस्थापक सेल्वगणेश आहेत. ते म्हणतात, आमचे अनेक कर्मचारी हे जुनेच आहेत. मात्र ते आमची कंपनी सोडून कधीच जाणार नाहीत असे समजून आम्ही राहू शकत नाही. कर्मचाऱ्यांच्या मनात नोकरी सोडण्याचा विचार येण्याआधी आम्ही त्यांना त्यांचा हक्क देतो. कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण असेल तर ते थेट माझ्याशी संपर्क करतात.