Latest

CWG 2022 Hockey : भारतीय संघ अंतिम फेरीत, दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव करत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला. भारतीय संघाने तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेची अंतिम फेरीत गाठली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. यासह भारतीय पुरुष हॉकी संघाने किमान सिल्व्हर कांस्य पदक निश्चित केले आहे. (CWG 2022 Hockey indian men s hockey team reached the final)

टोकियो ऑलिम्पिक ब्रांझ पदक विजेत्या आणि जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताला 13व्या क्रमांकाच्या दक्षिण आफ्रिकेने 60 मिनिटे कडवी झुंज दिली. या सामन्यात भारताने हाफ टाईमपर्यंत 2-0 अशी आघाडी घेतली होती. साखळी फेरीत अपराजित राहिलेल्या भारतासाठी अभिषेकने 20व्या, मनदीप सिंगने 28व्या मिनिटाला गोल केले, तर दक्षिण आफ्रिकेकडून रायन ज्युलियसने 33व्या आणि एम कासिमने 59व्या मिनिटाला गोल करून भारतीय संघाला आव्हान दिले. (CWG 2022 Hockey)

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला सामन्यातील पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र भारतीय संघाला या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. भारतानंतर दक्षिण आफ्रिकेलाही सामन्यातील दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचा भारतीय संघाने चांगला बचाव केला. मात्र, त्यानंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेने आपले खाते उघडले. दक्षिण आफ्रिकेसाठी ज्युलियसने हा गोल केला. या गोलनंतर दक्षिण आफ्रिकेने सामन्यात 1-2 अशी आघाडी घेतली. यानंतर भारतीय संघ दडपणाखाली दिसू लागला. याच क्वार्टरमध्ये दक्षिण आफ्रिकेला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशने दक्षिण आफ्रिकेचे आक्रमण हाणून पाडले.

तिसरा क्वार्टर संपण्याच्या काही वेळापूर्वी भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण यावेळीही दक्षिण आफ्रिकेचा गोलरक्षक गोवन जोन्स संघासाठी भिंत बनून उभा राहिला. दरम्यान, कॅप्टन मनप्रीत सिंगला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. पण तिसरा क्वार्टर संपण्याच्या एक मिनिट आधी तो आला. यानंतर तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारतीय संघ 2-1 ने पुढे होता.

भारतीय संघाने चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्येही काही उत्तम संधी निर्माण केल्या. बचावात जबरदस्त ताकद दाखवत भारतीय संघ सामन्यात सातत्याने आक्रमण करत होता. पण तरीही 2-1 अशी आघाडी कायम होती. सामना संपायला चार मिनिटे बाकी असताना दक्षिण आफ्रिकेने त्यांचा गोलकीपर काढून 11 आक्रमक खेळाडूंसह खेळण्यास सुरुवात केली. यानंतर भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि जुगराज सिंगने 58व्या मिनीटाला गोल करत भारताची आघाडी 3-1 पर्यंत पोहचवली. मात्र, दक्षिण आफ्रिकेनेही एक मिनिट शिल्लक असताना आणखी एक गोल नोंदवून गोल स्कोअर 2-3 पर्यंत आणला. मात्र, यानंतर भारताने बचाव भक्कम करून विजयाची नोंद केली.

राष्ट्रकुलमध्ये पुरुष हॉकी स्पर्धेत भारताला आजपर्यंत सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील सहाही सुवर्णपदके ऑस्ट्रेलियाने पटकावली आहेत. भारताने 2010 मध्ये दिल्लीत आणि 2014 मध्ये ग्लासगो येथे दोनदा रौप्यपदक जिंकले होते, तर गेल्या वेळी गोल्ड कोस्टमध्ये भारताची झोळी रिकामी राहिली होती. (CWG 2022 Hockey)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT