पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या विद्यापीठाने यापुढे मासिक पाळी काळात विद्यार्थिनींना सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश विद्यापीठाने आदेश जारी केला आहे. असा निर्णय घेणारे हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) नेतृत्वाखालील विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने मासिक पाळीच्या सुट्टीला ( Menstrual Leave ) परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. विद्यार्थिनींच्या मागणीवर गांभीर्याने विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचा लाभ चार हजारांहून अधिक विद्यार्थिनींना होणार आहे.
विद्यापीठाच्या या निर्णयानंतर विद्यार्थिनी मासिक पाळीच्या काळात सुटी घेवू शकतात. यासाठी विद्यार्थिनींना प्रत्येक सत्रात
(सेमिस्टर ) 2 टक्के अतिरिक्त सुटीचा लाभ दिला जाणार आहे. मासिक पाळी सुटीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आणि विद्यार्थ्यांना फक्त अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार, परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रत्येक सेमिस्टरमध्ये किमान 75 टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. परंतु मासिक पाळीच्या रजेमुळे विद्यार्थिनींना दोन टक्के सवलत दिल्यास अनिवार्य उपस्थिती 73 टक्के होईल.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) नेतृत्वाखालील विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने विद्यापीठाने मासिक पाळीच्या सुट्टीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. युनियनच्या या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या सिंडिकेट सदस्य डॉ. पौर्णिमा नारायणन म्हणाल्या की, विद्यापीठाने विद्यार्थी संघटनेच्या मागणीची दखल घेत महिला विद्यार्थ्यांप्रती हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भविष्यात, शैक्षणिक क्षेत्रात मुलींसाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा विचार करावा लागेल.
दरम्यान, केरळमधील महात्मा गांधी विद्यापीठाने गेल्या महिन्यात पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थिनींना 60 दिवसांची प्रसूती रजा देण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचलंत का ?