पुढारी ऑनलाईन डेस्क : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड ( CJI DY Chandrachud ) यांनी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील विकास सिंह यांना आज ( दि. २ ) चांगलेच फटकारले. तुम्ही माझ्या कोर्टातून चालते व्हा, मी असले प्रकार खपवून घेणार नाही, अशा शब्दांत त्यांनी ॲड. विकास सिंह यांना इशारा दिला. जाणून घेवूया सर्वोच्च न्यायालयात आज नेमकं काय घडलं?
'एससीबीए'ला जमीन मिळण्याबाबतच्या प्रकरण आज ( दि. २ ) सुनावणीस आले नाही. मागील सहावेळा या प्रकरणावरील सुनावणी पुढे गेली आहे, असे ॲड. विकास सिंह यांनी सरन्यायाधीश अध्यक्ष असलेल्या खंडपीठाला सांगितले. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे प्रकरण सामान्य क्रमाने सुनावणीस येईल, असे स्पष्ट केले. तसेच ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही या, असेही सांगितले. यावर ॲड. विकास सिंह म्हणाले की, "या प्रकरणी मला तुमच्या घरीच यावे लागेल."
ॲड. विकास सिंह यांच्या उत्तराने सरन्यायाधीश चंद्रचूड प्रचंड संतापले. "तुम्ही खाली बसा आणि एकदम गप्प बसा.", असे
सुनावत तुम्ही माझ्या कोर्टातून तत्काळ बाहेर जा. तुम्हाला वाटत असेल की खंडपीठ घाबरेल;पण आजवर अशा प्रकारे आमचा कोणतीही अपमान केलेले नाही. माझ्या कारकीर्दीची आणखी दोन वर्ष राहिले असून यापुढही मी असे प्रकार खपवून घेणार नाही, असेही सरन्यायाधीशांनी ठणकावले.
"मी माझा निर्णय सांगितला आहे. तुम्ही कृपया माझ्या कोर्टातून बाहेर जा. या प्रकरणी आता १७ मार्च रोजी सुनावणी होईल. तसेच या दिवशीही प्रथम क्रमाकांवर ही सुनावणी होणार नाही, सामान्य याचिकेसारखाच व्यवहार होईल," असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष आहात आणि असे वागता? असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. यावर ॲड विकास सिंह यांनी बार असोसिएशनला तुम्ही गृहित धरु शकत नाही, असे म्हणाले. यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, "मी यावर माझा निर्णय दिला आहे आणि तोच अंतिम आहे." अखेर न्यायमूर्ती पीएस. नरसिम्हा यांनी कृपया हे प्रकरण थांबावावे, अशी विनंती केली आणि यावर पडदा पडला.
यापूर्वीही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ॲड. विकास सिंह यांच्या वागणूक व भाषेवर नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी ॲड. विकास सिंह यांनी केलेल्या एका टिप्पणीवर सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, "माझ्या कोर्टात अशी भाषा चालणार नाही "
काही दिवसांपूर्वी ॲड. विकास सिंह यांच्यावर न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि सी.टी. रवि कुमार यांनी नाराजी व्यक्त केली होती. "तुम्ही बार असोसिएशनचे अध्यक्ष असाल; पण न्यायालयात मोठ्या आवाजात बोलून आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न कर नका," असे न्यायमूर्तींनी विकास सिंह यांना सुनावले होते. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनीही एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी अशीच नाराजी व्यक्त केली होती.