पुढारी ऑनलाईन डेस्क : खेळाचा महाकुंभ म्हटल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. सुवर्णपदक जिंकल्यानंतर खेळाडू काही दिवस यातून बाहेर पडू शकत नाहीत. त्याचवेळी लग्नाचा प्रस्ताव आल्यास काय होईल? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दररोज एकापेक्षा एक स्पर्धा पाहायला मिळत आहे. शुक्रवारी जे घडले ते आश्चर्यकारक होते. चीनच्या महिला खेळाडूने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आणि यानंतर तिला तिच्या सहकारी खेळाडूकडून लग्नाचा प्रस्ताव आला.
चीनची बॅडमिंटनपटू हुआंग या किओंगने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी सहकारी झेंग सिवेईसह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. दक्षिण कोरियाच्या किम वोन हो आणि जेओंग ना युन यांचा त्यांनी पराभव केला. या सामन्यात चीनच्या या जोडीने दक्षिण कोरियाचा ४१ मिनिटांत २१-८, २१-११ असा पराभव केला. मिश्र दुहेरी स्पर्धा संपल्यानंतर पदक प्रदान समारंभ झाला. हुआंग या किओंगने सुवर्ण पदक स्विकारलं आणि व्यासपीठावरून खाली उतरली. त्याचवेळी व्यासपीठाजवळच हुआंगचा मित्र चीनचा स्टार बॅडमिंटनपटू लियू युचेन याने तिला प्रपोज केले. जे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यानंतर ती आपल्या सहकारी खेळाडूचा लग्नाचा प्रस्ताव नाकारू शकली नाही. तिने युचेनकडून लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला.
हुआंग आणि लियू युचेन यांच्या आधीही ऑलिम्पिकच्या सुरुवातीला असेच दृश्य पाहायला मिळाले होते. उद्घाटन समारंभात अर्जेंटिनाच्या एका खेळाडूने आपल्या सहकाऱ्याला सर्वांसमोर प्रपोज केले. अर्जेंटिनाच्या पुरुष हँडबॉल संघाचा खेळाडू पाब्लो सिमोनेटने अर्जेंटिनाच्या महिला हॉकी संघाची खेळाडू मारिया कॅम्पॉयला प्रपोज केले होते. हे दोन्ही खेळाडू २०१५ पासून एकमेकांना डेट करत होते. या खास क्षणाचा व्हिडीओ स्वतः ऑलिम्पिक गेम्सने आपल्या 'एक्स' हँडलवर शेअर केला, जो खूप व्हायरल झाला होता.