वॉशिंग्टन : वृत्तसंस्था राजनैतिक आणि सामरिक पातळीवर सुरू असलेला चीन विरुद्ध अमेरिका संघर्ष (China's Drug War) आता ड्रग्ज वॉरपर्यंत पोहोचला आहे. मेक्सिकोतील कुख्यात ड्रग्ज तस्करांमार्फत चीन फेन्टानिल हे अतिघातक मादकद्रव्य अमेरिकेत पाठवत असून त्या माध्यमातून अमेरिकेची तरुण पिढी बरबाद करण्याचा प्लॅन आहे. अमेरिकेच्या अमली पदार्थविरोधी संचालनालयाचे माजी प्रमुख डेरेक माल्टझ यांनी ही माहिती दिली आहे. चीन आणि मेक्सिकन तस्कर यांच्या साटेलोट्याचे पुरावेही बायडेन प्रशासनाकडे असल्याचे ते म्हणाले.
अनेस्थेशिया देण्यासाठी इतर औषधांसोबत असणारे फेन्टानिल हे घातक औषध असून त्याचा वापर अमली पदार्थ अधिक नशिले करण्यासाठी केला जातो. हेरॉईन, कोकेन, केटामाईन, एमडीएमए या अमली पदार्थात फेन्टानिल मिसळल्यावर ते अमली पदार्थ अधिक नशा देतात. सध्या फेन्टानिल असलेले अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अमेरिकेत वाढले आहे. हा सारा उद्योग चीन करत असल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला •असून अमेरिकेची तरुण पिढी बरबाद करण्याचा चीनचा डाव असल्याचे सांगितले जाते. याबाबत अमेरिकेच्या अमली पदार्थविरोधी संचालनालयाचे माजी प्रमुख डेरेक माल्टझ यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, फेन्टानिलचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होते. याशिवाय बेकायदा स्वरूपातही चीन ते जगभर विकतो. अमेरिकेत याचप्रकारे चीनने ड्रग्जचा वापर सुरू केला आहे. चीनचे फेन्टानिल मेक्सिकोच्या ड्रग्ज तस्करांकडे पाठवले जाते. ते तेथे हेरॉईन, कोकेन, केटामाईन, एमडीएमए या अमली पदार्थात मिसळून अधिक घातक ड्रग्ज तयार करून ते अमेरिकेत पाठवले जाते. अमेरिकेसाठी मेक्सिकोतील ड्रग तस्कर कायमच डोकेदुखी ठरले आहेत.
माल्टझ म्हणाले की, मेक्सिकोत ड्रग्ज तस्करांच्या मोठाल्या प्रयोगशाळाच असून तेथे हे मिश्रण केले जाते. या संदर्भातील सगळे पुरावे बायडेन प्रशासनाकडे आहेत. चीनने मागच्या दहा वर्षांपासून हळूहळू करीत ड्रग्ज व्यवसायाचा वापर करायला सुरुवात केली आहे. व्यापार, व्यवसाय, राजकारण, लष्करी ताकद यात अमेरिकेचा मुकाबला करण्यापेक्षा ड्रग्जच्या माध्यमातून अमेरिका खिळखिळी करण्याचा डाव असून यावर लवकर उपाय शोधला पाहिजे, असे ते म्हणाले.
अनेस्थेशिया देण्यासाठी इतर औषधांसोबत असणारे फेन्टानिल हे घातक औषध आहे. ते प्रयोगशाळेत बनवले जाते. त्याला सिंथेटिक ड्रग असे म्हणतात. हेरॉईन, कोकेन, केटामाईन, एमडीएमए या अमली पदार्थात फेन्टानिल मिसळून ते अमली पदार्थ आणखी घातक बनवले जातात.
या ड्रग्जच्या ओव्हरडोसने मरण्याचे प्रमाण २०१३ ते २०१६ या काळात ११३ टक्क्यांनी वाढले आहे. २०२१ मध्ये या ड्रग्जच्या ओव्हरडोसने मरण पावलेल्यांची संख्या १ लाख ७ हजार होती. एक किलो फेन्टानिल तयार करायला ६ हजार डॉलर्स खर्च येतो; पण हेच फेन्टानिल मिसळलेले एक किलो हेरॉईन तब्बल १ लाख डॉलर्सला विकले जाते. २ मिलीग्रॅम फेन्टानिल हा ओव्हरडोस मानला जातो. २ मिलीग्रॅम म्हणजे पेन्सिलीच्या टोकावर बसू शकेल एवढेच कण.
हेही वाचा