पुढारी ऑनलाईन डेस्क : आताच्या सरकारचे पाय जमिनीवर नाहीत. सर्व घटकांना सोबत घ्यायचं असतं. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुसत्या चिठ्या वाचून दाखवतात आणि काही झालं की दोन- तीन दिवस साताऱ्यात येवून राहतात. शेती करायला आलो म्हणतात, पण स्ट्रॉबेरी बघून शेती होते का, काय चाललयं तेच कळना, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. सातारा येथे ते बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री ३ दिवसात ६५ फाईल्स क्लिअर केल्या सांगतात. मात्र मंत्रालयात ३ हजार फाईल्स पडून आहेत. वर्षभरात आढावा बैठक कधीही घेतली नाही. मी कधीही खोटं आरोप करत नाही. मुख्यमंत्री शिंदे नुसत्या चिठ्या वाचून दाखवतात. मला कुणाची चिठ्ठी देण्याची हिम्मत आहे का? त्यांनी एखादी नोट घ्यावी आणि पॉईंटने बोलावे. त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. सत्ता असताना आम्ही सत्तेची मस्ती येवू दिली नाही. खरं बोललो तर तुम्हाला राग येतो. एक वर्ष पुर्ण झालं सरकारने आतापर्यंत काय केलं. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत नाही. राज्य सरकार झोपा काढतय का? असा सवाल अजित पवार यांनी केला.
आताच्या सरकारचे मंत्री कुणाला विचारत नाहीत. मंत्री मंत्रालयात बसायला तयार नाहीत. आर्थिक पाहणी अहवालमध्ये सरकारची पिछेहाट का होत आहे, याचं उत्तर सरकारने द्यायला हवे. जाहीरातबाजीवर आम्ही कधी खर्च केला नाही. जनतेच्या पैशातून प्रसिद्धी चालली आहे. मी पण चार वेळा अर्थमंत्री होतो पण गरजेपुरताच जाहीरातीवर खर्च केला. काही लोकप्रतीनिधींना दुसऱ्यांना शिव्या देणं म्हणजेच सभा जिंकली अस वाटतं. पण आम्हाला शिव्या देण्यापेक्षा काम करा, असेही पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :