Latest

Chhagan Bhujbal | कोणाला घाबरून माघार घेतली नाही, प्रकाश शेंडगेंना दिलेल्या पत्रावरुन भुजबळ संतापले

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणावरून सुरू असलेला मराठा ओबीसी वाद लोकसभा निवडणुकीतही सुरूच असून, सांगली येथील ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला चपलांचा हार, शाईफेक तसेच मराठ्यांच्या नादाला लागू नका अन्यथा राज्यात फिरू देणार नाही, असे पत्र लावण्यात आल्याने घटनेचा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दांत निषेध करत असे प्रकार चुकीचे असून, पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे. तसेच पत्रामध्ये भुजबळांनी जशी माघार घेतली तशी घ्या असादेखील उल्लेख असल्याने याबाबत बोलताना 'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही' कोणाला घाबरून माघार घेतली नाही तर माझ्यामुळे जर महायुतीतील पक्षांना अडचण होत असेल तर मी बाजूला होतो. पण लवकरच निर्णय होऊन कामाला लागावे यासाठी माघार घेतल्याचे वक्तव्य भुजबळ यांनी केले.

भुजबळ म्हणाले की, शेंडगे यांच्या गाडीवरील हल्ला निंदनीय आहे. अशा प्रकारे हल्ला करून समाजात भीती माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक वेळा मला धमक्या आल्या, हल्ले झाले, शिवीगाळदेखील झाली. मात्र, मी कुणालाही घाबरत नाही. घाबरून निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. माझ्यामुळे जर महायुतीतील पक्षांना अडचण होत असेल तर मी बाजूला होतो. पण लवकरच एकत्रितपणे निर्णय घेऊन निवडणुकीच्या कामाला लागायला पाहिजे, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले.

शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती वाटते हे खरे आहे. मात्र, लोक मतदानाला जाताना सहानुभूती वगैरे बाजूला ठेवतात. देशाचे नेतृत्व करण्याची ज्याची क्षमता आहे. त्यालाच लोक मतदान करणार आहेत. ती क्षमता सध्या तरी मोदी यांच्याकडे आहे. तसेच बारामतीच्या निवडणुकीबाबत आपल्याला खेद वाटतो. पवार साहेब आणि अजित पवार यांच्यासोबत गेली अनेक वर्षे काम केल्यानंतर त्या कुटुंबाबाबत आत्मीयता वाटते. मात्र, सद्यस्थितीत निवडणुका बघताना आनंद कसा वाटू शकतो, असा प्रतिप्रश्नदेखील भुजबळ यांनी यावेळी केला.

जरांगे काहीही बडबडतात

मराठा समाजाच्या एकीमुळेच पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सभा घेत आहेत. असे वक्तव्य मनोज जरांगे-पाटील यांनी केले होते. भुजब‌ळांनी यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे हे काय मोदींपेक्षा मोठे नेते आहेत काय?, जरांगे काय सांगतात, काय बडबडतात. त्याची अक्कलहुशारी किती? नाशिक, बीडमध्ये जाऊन जरांगे म्हणतात की, ओपनच्या जागांवर ओबीसी उमेदवार कशासाठी उभे राहतात? त्यांना कळत नाही ओबीसींना विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण नाही. ही गोष्ट ज्याला कळत नाही, त्याला आपण काय सांगायचं. जरांगे सध्या कोणाच्याही खिजगणतीतही नाही, ते उगाच बेडकाप्रमाणे फुगत असल्याची टीका भुजबळांनी केली.

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT