सरूड : पुढारी वृत्तसेवा : सरूड येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेला १५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. गौरवशाली शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी सामुदायिक प्रयत्नांतून शाळेला डिजीटल रूप देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. रंगरंगोटी, सजावट, प्रेरणामूर्तींचा इतिहासपट, अक्षर, प्राणी, वनस्पतींची ओळख, सुविचार, संगणक लॅब आदी जाणीवपूर्वक झालेल्या बदलाने शाळेचे अंतर्बाह्य पालटलेले देखणे रूप अधिक खुलून दिसत आहे.
संबधित बातम्या
दरम्यान, ऐतिहासिक शाळेने दीडशे वर्षे अखंडित शैक्षणिक वाटचालीत देश आणि राज्यपातळीवर प्रशासकीय, शासकीय, खाजगी अशा विविध क्षेत्रात कामाचा ठसा उमटवणारे अनेक विद्यार्थी घडविले आहेत. साहजिकच सरूड हे 'अधिकाऱ्यांचे गाव' म्हणून आज नावारूपाला आले आहे. याचा प्रत्येक सरूडकरांना सार्थ अभिमान वाटतो. यातूनच आर्थिक मदत उभी राहून दीड शताब्दी पूर्तीच्या औचित्याने गेल्या वर्षभरात या शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या. याशिवाय अनेक विकासात्मक उपक्रमही राबविले गेले आहेत.
मुख्याध्यापक कृष्णात मस्के, सहअध्यापक सुरेश बंडगर यांना साथीला घेत अनिकेत नांगरे, मनीष तडवळेकर, वीरधवल पाटील, अजित पाटील, अमर पाटील, लक्ष्मण डाकवे, सर्जेराव डाकवे या तरुणांच्या पुढाकाराने 'एक गाव.. देशभर नाव' या टॅगलाईन खाली 'ज्ञानदीप लावू जगी' हा नारा दिला आहे. या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शाळेच्या विकासासाठी मदतगार पुढे येतील, यासाठी या तरुणांची अद्यापही धडपड सुरू आहे.
दरम्यान, शाळेच्या दीड शताब्दी वर्षपूर्ती प्रित्यर्थ माजी विद्यार्थी संघटनेने विशेष गौरव (स्मरणिका) अंक प्रकाशित करण्याचा मनोदय केला आहे. यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. यासाठी 'माझे गाव माझी शाळा' या संदर्भाने आलेले स्वानुभव, कथा, कविता, लेख शब्दबद्ध करून असे साहित्य १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेचे शिवाजी रोडे-पाटील तसेच अनिकेत नांगरे-पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा