नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सादर केला. या प्रस्तावावर सोमवारी चर्चा करण्यात येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय ने घातलेल्या धाडी नंतर कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाही, असा दावा केजरीवाल यांनी विधानसभेत केला. १४ तास चाललेल्या धाड सत्रादरम्यान सीबीआयाला कुठलीही रोकड तसेच दागिने मिळाले नाहीत. कुठलीही जमीन अथवा संपत्ती संबंधी कागदपत्र देखील मिळाले नाहीत.
आक्षेपार्ह कागदपत्रे देखील त्यांना मिळाली नाही. अशात ही धाड केवळ 'फर्जी' होती, अशा शब्दात केजरीवाल यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारवर टीकास्त्र चढवले. यापूर्वी १९ ऑगस्टला मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली होती. दिल्लीतील आबकारी धोरणात अनियमितता केल्याचा आरोप सिसोदियांवर लावण्यात आला आहे.
विधानसभेत जोरदार घोषणाबाजी
आबकारी धोरणासंबंधी भाजपकडून आप सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आप कडून दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच वाक् युद्ध रंगल्याचे दिसून आले. आप आमदारांनी 'खोका-खोका २० खोका' अशी घोषणाबाजी करीत भाजप आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. दरम्यान केरजरीवाल यांनी त्यांच्या आमदारांसोबत राजघाट येथे जावून 'ऑपरेशन लोटस' अपयशी ठरावे अशी प्रार्थना केली. तदनंतर भाजप कार्यकर्त्यांनी राजघाट परिसरात जावून गंगाजलाचा छिडकाव केला.
हेही वाचा