Latest

माउंट मेरू शिखर काबिज करत पुणेकरांनी घडवला इतिहास

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गिरिप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी माउंट मेरू 6660 मीटर उंच व एव्हरेस्टपेक्षाही आव्हानात्मक शिखरावर यशस्वी चढाई केली. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गिरिप्रेमीच्या गणेश मोरे, विवेक शिवदे, वरुण भागवत, मिंग्मा शेर्पा व नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गुसाई व त्यांचे सहकारी बिहारी राणा व अजित रावत यांनी शिखरावर भारतीय तिरंगा फडकावून इतिहास रचला. गिरिप्रेमीची ही मोहीम नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. मोहिमेदरम्यान संघाने मेरू शिखराच्या पश्चिम बाजूने चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण असलेल्या नैऋत्य धारेने शिखर चढाई यशस्वी केली. माउंट मेरूच्या दक्षिण शिखरावर चढाई करणारा गिरिप्रेमी व एनआयएमचा संघ हा भारतातील पहिला संघ ठरला असून पश्चिम बाजूने मेरू शिखर चढाई करणारा जगातील पहिला संघ ठरला आहे.

या मोहिमेचे नेतृत्व उमेश झिरपे करत असून दावा शेर्पा, फुर्रतेनसिंग शेर्पा या शेर्पा सहाय्यकांनी देखील मेरू शिखरावर चढाई केली. लाक्पा शेर्पा यांनी कॅम्प 1 (5500 मीटर उंच) ला थांबून मोहिमेच्या यशस्वीतेत मोलाचा हातभार लागला. नेहरू इन्स्टिट्यूटचे प्रिन्सिपल कर्नल अंशुमन भदोरिया व व्हाईस प्रिन्सिपल डॉ. मेजर देवल वाजपेयी यांच्या सहकार्याने मोहिमेच्या तयारीत व यशस्वीतेत मोलाची मदत झाली. याच वर्षी मे महिन्यामध्ये गिरिप्रेमीच्या संघाने माउंट मेरू मोहीम आयोजित केली होती. मात्र लहरी व खराब हवामानाने संपूर्ण मोहिमेदरम्यान संघाची परीक्षा पाहिली, शेवटी शिखरमाथा अवघ्या 200 मीटरवर असताना संघाला परतावे लागले होते.

या मोहिमेतून आलेले अनुभव व शिकवणीचा फायदा यावेळी झाला. संघाचा मुक्काम 25 ऑगस्ट पासून कीर्ती बमक ग्लेशियरवर वसलेल्या बेस कॅम्प (4800 मीटर) वर होता. हिमालयात सतत होणार्‍या पावसामुळे यावेळी देखील हवामान साथ देते कि नाही हा प्रश्न गिर्यारोहकांसमोर होता. मात्र, सुदैवाने हवामानाने यावेळी साथ दिल्याने शिखर चढाईसाठी मदत झाली. गिरिप्रेमीच्या निष्णात व निपुण गिर्यारोहकांनी सलग दहा तास चढाई करून कॅम्प 1 पासून पुढे शिखरमाथ्यावर चढाई केली व भारतीयच नव्हे तर जगाच्या गिर्यारोहण इतिहासामध्ये नवा अध्याय जोडला. या आधी गिरिप्रेमीने जगातील 14 पैकी आठ अष्टहजारी शिखरांना गवसणी घातली आहे. यात एव्हरेस्ट, कांचनजुंगा, अन्नपूर्णा यांसारख्या खडतर शिखरांचा समावेश आहे.

माउंट मेरू शिखरावर चढाई करणार्‍या गिर्यारोहकांमध्ये गणेश मोरे (माउंट एव्हरेस्ट व माउंट च्योयु शिखरवीर), विवेक शिवदे (माउंट कांचनजुंगा, माउंट अमा दब्लम, माउंट मंदा शिखरवीर), वरुण भागवत (तरुण गिर्यारोहक, माउंट भ्रिगु पर्वत शिखरवीर), गिरिप्रेमीचे सदस्य व एव्हरेस्टसह विविध अष्टहजारी शिखरांवर अनेकवेळा चढाई केलेले जागतिक कीर्तीचे गिर्यारोहक मिंग्मा शेर्पा व एव्हरेस्ट शिखरवीर व नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गुसाई यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT