पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या बुली बाई अॅप प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला आसाम मधून दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ ( IFSO) च्या स्पेशल सेलने अटक केली आहे.
बुली बाई अॅप प्रकरणात एका आरोपीस काल उत्तराखंड येथून मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली होती. मयांक रावत असे या आरोपीचे नाव असून तो इंजिनिअर आहे. ट्रान्झिट रिमांडवर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी विशाल झा आणि श्वेता सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.
बुली बाई अॅपच्या माध्यमातून मुस्लिम समुदायातील महिलांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन त्यांची बोली लावली जात होती. हा प्रकार उघडकीस येताच दिल्ली आणि मुंबई सायबर सेल पोलिसांत दोन गुन्ह्यांची उकल केल्यानंतर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत तपासाचा तपशील दिला.
हे संपूर्ण प्रकरण एका गंभीर कटाचा भाग असून आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत, असे सांगून नगराळे म्हणाले, तपासात काही आक्षेपार्ह मेल सापडले आहेत. बुली बाई अॅप तयार करण्यासाठी आरोपींनी गीटहब या प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. शीख धर्मियांशी संबंधित शब्दांचा वापर करुन मुस्लिम महिलांना या अॅपद्वारे टार्गेट केले जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
हेही वाचलत का?