नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तथागत बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर जग चालले असते तर हवमान बदलासारख्या संकटाचा कधी सामना करावा लागला नसता, असे स्पष्ट करत बुद्धाचा मार्ग हाच भविष्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ( Global Buddhist Summit 2023 ) आज ( दि. २०) जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संस्कृती मंत्रालयाच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय परिषदेत जगभरातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "गेल्या शतकात काही देशांनी येणार्या पिढ्यांबद्दल विचार न केल्याने हवामान बदलासारखे संकट आले आहे. लाईफस्टाईलचा प्रभाव देखील वसुंधरेवर पडत आहे; पंरतु आपण ठरवले तर पृथ्वीला या संकटातून वाचवू शकतो. प्रत्येक व्यक्ती हवामान बदलाच्या समस्येचा सामना करू शकतो. नागरिकांना जागरुक होवून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रयत्नाने या मोठ्या समस्येला तोंड दिले जावू शकते आणि हाच बुद्धाचा मार्ग आहे,"
जगाला सुखी करायचे असेल तर स्वतःमधून बाहेर पडून जगाची संकुचित विचारसरणी त्यागली पाहिजे. संपूर्णतेचा हा बुद्धाने दिलेला मंत्रच एकमेव मार्ग आहे, असे पंतप्रधान म्हणाले.जगाताील वेगवेगळ्या भागात शांतता अभियान असो अथवा तुर्कीये मधील भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती असतो, भारत संपूर्ण ताकदीनिशी प्रत्येक संकटकाळात सर्वांसोबत उभा राहतो. 'परियक्ति, पटिपत्ती तसेच पटिवेध' हा बुद्धाचा मार्ग आहे. गेल्या ९ वर्षात भारत या तीन ही बिंदुंवर वेगाने मार्गक्रमण करीत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
बुद्ध व्यक्तीहून पुढे जात एक बोध आहे. बुद्ध स्वरुपाहून पुढे जात एक विचार आहे. बुद्ध चित्रणातून पुढे जात एक चेतना आहे आणि बुद्धाची ही चेतना चिरंतर आहे. हा विचार शाश्वत आहे, बोध अविस्मरणीय आहे. यामुळेच आज वेगवेगळ्या देशातून भौगोलिक-सांस्कृतिक वातावरणातून लोक उपस्थित आहेत. हीच भगवान बुद्धाचा विस्तार आहे जो संपूर्ण मानवतेला एका सुत्रात जोडतो, असे पंतप्रधान म्हणाले.
समकालीन आव्हानांना प्रतिसादः तत्वज्ञान ते अभ्यास हा दोन दिवसीय परिषदेतचा विषय आहे. परिषदेत जवळपास ३० देशांचे १७१ प्रतिनिधी तसेच भारतीय बौद्ध संघटनेचे १५० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. जगभरातील प्रतिष्ठित विद्वान, संघाचे नेते आणि धर्माचे अनुयायी देखील या परिषदेत सहभागी होतील.
हेही वाचा :