पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या निरक्षर स्त्री व पुरुष यांच्या सर्वेक्षणावर राज्य प्राथमिक शिक्षक संघाने बहिष्कार घातला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली. नाशिक येथे रविवारी शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत निरक्षर सर्वेक्षणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष अंबादास वाजे, कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, सरचिटणीस आबासाहेब जगताप आदी उपस्थित होते.
तांबारे म्हणाले, शिक्षकांना दिल्या जाणार्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकास अध्यापनास वेळच मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदार नोंदणी, जणगणना, निवडणुका यासह जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने वेळोवेळी मागितलेली माहिती, वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाईन माहिती यासह शिक्षकांना 31 प्रकारची वेगवेगळी अशैक्षणिक कामे करावी लागतात. या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रतिकुल परिणाम होत आहे. निरक्षर लोकांना साक्षर करण्याच्या प्रयत्नात शाळेत येणारे 6 ते 14 वयोगटातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी निरक्षर होण्याचा धोका निर्माण झाला आहे, यामुळे हा बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या प्रशासनाकडून दररोज वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागवली जात आहे.
या आदेशामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांना अध्यापनासाठी वेळच मिळत नाही, अशी परिस्थिती असल्यामुळे आम्हाला आता विद्यार्थ्यांना शिकवू द्या, अशी म्हणण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. सध्या राज्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा तरुणांकडून अशी अशैक्षणिक कामे करून घेण्याची गरज आहे. पण तसे होताना दिसत नाही. म्हणून अशी वेगवेगळ्या प्रकारची अशैक्षणिक कामे इतर यंत्रणांकडून करून घ्यावीत व शिक्षकांना फक्त अध्यापनाचे काम द्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असल्याचे तांबारे यांनी सांगितले.
हेही वाचा :