Latest

विराट-अनुष्‍काच्‍या मुलीबाबत आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्याविरोधातील गुन्‍हा रद्द, जाणून घ्‍या काय होते प्रकरण?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांच्‍या मुलीबाबत आक्षेपार्ह ट्विट करणार्‍याविरोधातील गुन्‍हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे . या प्रकरणी विराट कोहली याचा व्‍यवस्‍थापक अक्विलिया डिसोझा यांनी आरोपींवरील आरोप वगळण्यास संमती दिल्यानंतर न्यायमूर्ती एएस गडकरी आणि न्यायमूर्ती पीडी नाईक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

भारतीय क्रिकेट संघ पराभूत झाल्‍यानंतर केले होते आक्षेपार्ह ट्विट

२४ ऑक्‍टोबर २०२१ रोजी टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्‍तान विरुद्धच्‍या सामन्‍यात पराभव झाला होता. यानंतर २५ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता रामनागेश अकुबथिनी याने विराटच्‍या मुलीविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट केले होते. या प्रकरणी फिर्याद दिल्‍यानंतर ८ नोव्‍हेंबर २०२१ रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्याखालील गुन्ह्यांसह भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी ) मधील कलम ३५४ (अपमानकारक विनयशीलता), ५०६ (गुन्हेगारी धमकी), ५०० (बदनामी) आणि २०१ (पुरावा नष्‍ट करणे ) अंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अकुबथिनीला हैदराबादमध्ये अटक केली होती. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. याप्रकरणी संशयित आरोपीला २१ नोव्‍हेंबर २०२१ रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता.

आरोपीची मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका

रामनागेश अकुबथिनी याने आपल्‍या विरोधातील गुन्‍हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेब्रुवारी २०२२ मध्‍ये दाखल केली होती. आपण जेईई परीक्षेताल रँकधारक असून, आयआयटी हैदराबादमधील पदवीधर आहे. सध्या एका नामांकित कंपनीमध्‍ये काम करत आहे. गुन्‍हा दाखल असल्‍याने परदेशातील शिक्षण व भविष्यात येणारे अडथळा यांचा विचार करून गुन्‍हा रद्द करावा, अशी विनंती याचिकेतून करण्‍यात आली होती. तसेच संबंधित ट्विट हे संशयित वापर असणार्‍या उपकरणाच्या आयपी पत्त्यावरून आले होते हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही, असाही दावा या याचिकेतून करण्‍यात आला होता.

याचिकेवर न्यायमूर्ती एएस गडकरी आणि न्यायमूर्ती पीडी नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. विराट कोहली याचा व्‍यवस्‍थापक अक्विलिया डिसोझा यांनी आरोपींवरील आरोप वगळण्यास संमती दिल्यानंतर खंडपीठाने रामनागेश अकुबथिनी याच्‍या विरुद्‍ध दाखल गुन्‍हा रद्‍द करण्‍याचे आदेश दिले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT