विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविल्याप्रकरणी एका आयटी अभियंत्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश सावंत (वय.28, रा.बाणेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सावंत याच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्याला पुर्वी गांजाचे व्यसन होते. त्यातूनच त्याने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. सावंत याने घातलेल्या राड्यामुळे रांचीला निघालेले विमान तब्बल तीन तास उशीरा उडाले. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत हा शहरातील एका आयटी कंपनीत कामाला आहे. तो मुळचा मुंबई येथील आहे. मागील काही दिवसापुर्वी तो पुण्यात वास्तव्यास आला आहे. शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास विमानतळावर पत्नीसोबत आला होता. त्याच्या पत्नीला रांची येथे जायचे होते. 16 तारखेला त्याच्या पत्नीचे परत येण्याचे तिकीट होते. मात्र 16 तारखेपासून विमानतळ बंद आहे. त्यामुळे सावंत हा परतीचे तिकीट पंधरा तारखेला अधिकृत करून द्या असे सांगत होता. मात्र ते डाऊनलोड झाले नाही. त्यामुळे त्याने निघालेल्या विमानात बॉम्ब आहे.
माझ्या स्वप्नात रोज रात्री विमानात बॉम्ब ठेवल्याचे येते. तुम्हाला पुढील पंधरा दिवस मोठा धोका आहे असे सांगू लागला. त्यामुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली. बॉम्बची माहिती मिळताच पोलिस यंत्रणेसह इतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.
विमानतळ पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथके, राज्य राखीव बलाच्या तुकड्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या तुकड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सावंत सांगत असलेल्या विमानाला बाजूला घेऊन तब्बल तीन तास कसून तपासणी केली. यावेळी सावंत याने विमानातील महिला कर्चमार्यांशी देखील अश्लिल वर्तन केले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सावंत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
विमानात बॉम्ब असल्याची अफवा एका व्यक्तीने पसरवली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपुर्ण विमानाची तपासणी केली. असा कोणताही प्रकार आढळला नाही. याप्रकरणी सबंधीत व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
भरत जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमानतळ पोलिस ठाणे
सकाळच्या सुमारास एका प्रवाशाने विमानात बॉम्ब असल्यासंदर्भात माहिती देणारा अफवेचा कॉल केला होता. त्यावेळी आम्ही तात्काळ संबंधित यंत्रणांना कळविले. विमानतळ, विमान आणि परिसराची तपासणी बॉम्ब स्कॉड कडून तपासणी करण्यात आली. मात्र, बाँम्ब नव्हता. नंतर पोलिसांनी तपासकरून फेक कॉल करणार्या व्यक्तीला अटक केली असल्याची आम्हाला माहिती दिली आहे.
– संतोष ढोके, संचालक, लोहगाव विमानतळ