लाहोर; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तान मधील पंजाब आणि सिंध प्रांतातील सिमेवर वाहणाऱ्या सिंधु नदीमध्ये एक बोट पलटी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १९ महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. एका बोटीतून १०० हून अधिक लोक बसून एका विवाह समारंभास जात होते. बेपत्ता असणाऱ्या लोकांसाठी शोधकार्य सुरु करण्यात आले आहे.
रहीम यार खान या शहर पासून जवळपास ६५ किलोमीटर दूर असणाऱ्या एका कबिल्यामधील हे सर्व लोक होते. रहीम यार खानचे उपायुक्त सैय्यद मूसा रजा यांनी माध्यमांना सागितले की, बेपत्ता लोकांसाठी शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. तसेच पाच रुग्णवाहिकांसह जवळपास ३० लोकांची टीम घटनास्थळी शोधकार्यात सक्रीय असल्याची माहिती त्यांनी दिली.
सैय्यद मुसा रजा म्हणाले, आतापर्यंत १९ मृतदेह शाेधण्यात यश आले आहे तसेच या सर्व १९ मृतदेह हे फक्त महिलांचे आहेत. उर्वरीत प्रवाशांची शोध सुरु आहे. पाकिस्तान येथील वृत्तपत्र डॉनच्या माहितीनुसार मागील आठवड्यात आपत्ती व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तसेच १५ ते १७ जुलैच्या दरम्यान कोणीही नदीपरिसरात जावू नये असे आवाहन देखिल केले होते. पाकिस्तानचे प्रधानमंत्री शाहबाज शरीफ यांनी ट्वीट करत या घटनेबाबत दुख: व्यक्त केले आहे.