Latest

Lok Sabha Election : लोकसभेसाठी भाजपची १८० उमेदवारांची यादी तयार?

दिनेश चोरगे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीमध्ये ३७० जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठरविलेल्या सत्ताधारी भाजपने प्रत्येक जागेवरील उमेदवार निवडीसाठी कंबर कसली आहे. त्या अंतर्गत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने पहिल्या टप्प्यात २५० जागांवर चर्चा केली असून १८० उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे समजते. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत जागावाटप पूर्ण झालेले नाही, अशा राज्यांमधील उमेदवारांबद्दलची चर्चा नंतरच्या टप्प्यात होणार असल्याचेही कळते.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक काल (गुरुवारी) दिल्लीतील पक्ष कार्यालयात झाली. पक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. मध्यरात्री तीन वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी १८० उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याची औपचारिक घोषणा केव्हाही होऊ शकते. पहिल्या यादीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची नावे असू शकतात. मात्र, या १८० जणांमध्ये प्रामुख्याने भाजपने २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गमावलेल्या जागांवरील उमेदवारांची नावे सर्वाधिक आहेत. जेणेकरून येथील पक्षाच्या उमेदवारांना तयारीसाठी जास्तीत जास्त वेळ मिळू शकेल, असे भाजप सुत्रांचे म्हणणे आहे.

भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल झालेल्या निवडणूक समितीच्या बैठकीत २३ राज्यांतील संभाव्य उमेदवारांची यादी सादर करण्यात आली. नव्या चेहऱ्यांचीही चर्चा झाली. मोदी सरकारने अलिकडेच संसदेत आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी संमत केलेल्या नारीशक्ती वंदन कायद्याच्या पार्श्वभूमीवर, पक्षातर्फे महिलांच्या आरक्षणाला बळकटी देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त महिला उमेदवार उभे करण्यावरही मंथन झाले. यामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांच्यासह विक्रमी संख्येने महिलांना कुठे उभे करायचे यावरही चर्चा झाली. सुत्रांच्या सांगण्यानुसार भाजप नेतृत्वाने ७० हून अधिक जागांवर महिलांना उमेदवारी देण्याबाबत तयारी केली आहे.

महाराष्ट्र नंतरच्या टप्प्यात

भाजप नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीसाठी एकेका जागेवर लक्ष केंद्रीत केले असल्याने ज्या राज्यांमध्ये युती तसेच जागावाटपाचे सूत्र ठरणे बाकी आहे, अशा राज्यांमधील उमेदवार यांदीबद्दलचे विचारमंथन भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये नंतर होईल असे कळते. यामध्ये महाराष्ट्र, बिहार यासारख्या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) मध्ये जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी सर्वाधिक जागा लढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर शिंदे गट आणि अजित पवार गटानेही आपापल्या प्रभाव क्षेत्रातील जागांसाठीची मागणी पुढे केल्याने कोण किती जागा लढणार याचे सुत्र अद्याप ठरलेले नाही. त्याच धर्तीवर बिहारमध्येही संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये जागा वाटपावर निर्णय झालेला नसल्याने नंतरच्या टप्प्यात या राज्यांमधील उमेदवार निश्चितीबद्दल चर्चा होईल असेही समजते. याखेरीज राजस्थानमधील सुमारे डझनभर जागांसाठी भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT