नागपूर , पुढारी वृत्तसेवा : केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर देशभरात अराजकता निर्माण झाली असून संविधान अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात स्वयंघोषित गोरक्षक, दलित आणि मुस्लिमांवर हल्ले चढवत आहेत. न्यायव्यवस्था खिळखिळी केली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानुसार हिंदुत्वाचा अजेंडा राबविला जात आहे. संघ व भाजपचे हिंदुत्व रोखण्यासाठी वामपंथी दलांनी लढा द्यावा, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी नागपूर येथे केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) २३ व्या राज्य अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित अधिवेशनाला नीलोत्पल बसू, अशोक ढवळे, मरियम ढवळे, जीवापांडू गावीत, नरसय्या आडम या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह स्वागताध्यक्ष विजय जावंधिया, अनिल ढोकपांडे, अरुण लाटकर आदी उपस्थित होते. गेल्या सात वर्षांपासून हिंदुत्वाचा अजेंडा राबविला जात असून कामगार, महिला आणि बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संघाची विचारसरणी देशात पेरली जात असून संविधान संपविण्याचे काम सुरू आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर देशद्रोही म्हणून कारवाई केली जाते. यामुळे लोकशाही संपुष्टात येते की काय, अशी भिती निर्माण झाली आहे, अशी टीका सीताराम येचुरी यांनी केली.
सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेले तीन कायदे बदलण्याची वेळ शेतकऱ्यांनी आणली. यापुढील काळात दडपशाही झुगारून सरकारला उलथून टाकण्यासाठी भीमशक्ती, लाल सलाम, कामगार, शेतकरी यांनी संघटीतपणे लढायला हवे, असेही येचुरी म्हणाले. दरम्यान, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय जावंधिया यांनी केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार विरोधी धोरणावर टीका करत अधिवेशनात चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन अरुण लाटकर यांनी केले.